अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन बराच कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप त्याच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी सीबीआय तपास सुरु असून सुशांतला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी चाहत्यांमधून होत आहे. केवळ देशातच नाही तर विदेशातदेखील सुशांतला न्याय मिळावा ही मागणी जोर धरु लागली आहे. अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियामध्ये सुशांतला न्याय मिळावा यासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत.
सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इन्स्टाग्रामवर काही होर्डिंग्सचा फोटो शेअर केला आहे. हे होर्डिंग ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी लावण्यात आले असून ‘ऑस्ट्रेलियाचा सुशांतला पाठिंबा आहे’, असं लिहिलं आहे.
“ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या सुशांतच्या चाहत्यांनी हे होर्डिंग्स लावून सुशांतला पाठिंबा दिला आहे. या होर्डिंग्सच्या माध्यमातून एक नवीन उर्जा मिळाली आहे आणि चांगला संदेश मिळाला आहे. पूर्ण ऑस्ट्रेलिया सुशांतसाठी उभा आहे. मनापासून धन्यवाद”, असं कॅप्शन देत श्वेताने हा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, यापूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सुशांतला न्याय मिळावा म्हणून होर्डिंग्स लावण्यात आले होते. सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे.