Shabana Azmi Birthday : ८० आणि ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज (१८ सप्टेंबर) ७४ वा वाढदिवस आहे. शबाना यांनी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी एकामागून एक अनेक उत्कृष्ट चित्रपटही केले.
शबाना यांनी प्रत्येक पात्र मनापासून साकारले. त्यांनी प्रत्येक भूमिका इतकी छान निभावली की, जणू काही ते पात्र त्यांच्यासाठीच बनलेले. शबाना यांना त्यांच्या अभिनयासाठी पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच शबाना एक सामाजिक कार्यकर्त्यादेखील आहेत. अभिनेत्रीला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.
१८ सप्टेंबर १९५० रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या शबाना आझमी यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील क्वीन मेरी स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली. शबाना आझमी यांनी १९७३ मध्ये पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचा कोर्स केला. ‘अंकुर’ या डेब्यू चित्रपटात शबाना यांनी मोलकरणीची भूमिका साकारली होती. मात्र, त्यांनी ही व्यक्तिरेखा इतकी छान साकारली होती की, त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, ज्या ‘उमराव जान’ आणि ‘सलाम बॉम्बे’सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. मे २०१९ मध्ये शौकत यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, शौकत यांच्या ‘कैफ अँड आय मेमोयर’ या आत्मचरित्रात शबाना यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आणि न ऐकलेले पैलू समोर आले, ज्यांनी सर्वांनाच थक्क केले.
शौकत आझमी यांच्या आत्मचरित्रात, शबाना कॉफी विकायच्या हे समोर आले. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘सीनियर केंब्रिजमध्ये फर्स्ट डिव्हिजन उत्तीर्ण झाल्यानंतर शबाना यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तीन महिने पेट्रोल पंपावर कॉफी विकली. यातून त्या दिवसाला ३० रुपये कमवायच्या. तिने मला याबद्दल कधीच सांगितले नाही. मी रीहर्सलमध्ये व्यग्र होते, त्यामुळे मला काहीच समजले नाही. एके दिवशी तिने माझ्यासाठी संपूर्ण पैसे आणले, मग मी तिला त्याबद्दल विचारले; तेव्हा तिने मला तीन महिने पेट्रोल पंपावर पैसे कसे कमावले याबद्दल सांगितले.’
‘कैफ अँड आय मेमोयर’ या आत्मचरित्रात शबाना यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेदेखील सांगितले होते. शबाना या फक्त ९ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. खरंतर शबाना यांना एका गोष्टीविषयी गैरसमज झाला होता की त्यांची आई त्यांच्यापेक्षा त्यांच्या भावावर जास्त प्रेम करतात.
शबाना आझमी यांनी प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न केले, जे आधीच विवाहित होते. जावेद अख्तर यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि १९८४ मध्ये शबाना यांच्याशी लग्न केले. शबाना यांना आई होण्याचा आनंद कधीच अनुभवता आला नाही, परंतु त्यांनी कधीही हे त्यांच्या आयुष्यात निराशेचे कारण बनू दिले नाही.