ट्विटर तरुणांचे माध्यम असले तरी रणवीर सिंग, रणबीर कपूर, वरुण धवनपेक्षा बिग बी जास्तच अ‍ॅक्टिव्ह का बरे असतात? आपण सतत फोकसमध्ये राहायला हवेच या वृत्तीने की त्याच्याकडे अगदी रोजच सांगण्यासारखे काहीतरी आहे म्हणून? ११ ऑक्टोबरला वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत असलेले अमिताभ बच्चन ट्विटरशी एकरुप कधी बरे झाले हे खुद्द त्यांनाच सांगता येणार नाही. खरंतर ‘अमिताभ बच्चन’ ही मोजून सात अक्षरे. पण त्याच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त इतके व असे भरभरून सांगता येईल की त्याच सात अक्षरानी सांस्कृतिक/ माध्यम/ सामाजिक/ आर्थिक क्षेत्रावर टाकलेला प्रभाव जाणून घेणे हे कदापि न संपणारे आहे. हा फक्त पडद्यावरचा हिरो नाही तर विविध स्तरावर व चौफेर दृष्टिकोनातून त्याच्यावर फोकस टाकता येईल.

एका पिढीचा हा ‘अँग्री यंग मॅन’. त्या पिढीने त्याच्या अष्टपैलू गुणवत्तेला मनसोक्त दाद दिली. एका पिढीने त्यांना ‘एबी’ असे शार्ट फॉर्ममध्ये पाहिले. त्यांनी हा ‘शहेनशहा’ एका दिवसात आपल्या कामाचे किती मानधन घेतो व त्याचा एखादा चित्रपट किंवा कौन बनेगा करोडपती त्याच एका दिवसात किती रिटर्न्स देतो अशा पद्धतीनेच आर्थिक तराजूत त्यांना मोजले.  एक पिढी त्यांना ‘बिग बी’ म्हणू लागली. एका कर्तबगार ‘उंची’ व्यक्तिमत्त्वाची प्रत्येक नवीन पिढीसोबत नवीन नावे हे तर जगभरातील चित्रपटसृष्टीत एकमेव सर्वोत्तम उदाहरण. ही पिढी सोशल नेटवर्किंग साइटवर मोठी होतेय. आणि या पिढीशी अमिताभ बच्चन खूपच छान कनेक्ट आहेत.

‘बिग बी’ला ट्विटरवर पोस्टसाठी वेळ तो कधी मिळतो आणि त्यातून तो काय बरे साध्य करतो अशी उगाच शंका असते. पण वक्तशीर व शिस्तबद्ध व्यक्तीला नवीन गोष्टीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. ‘बिग बी’ चित्रपटाच्या सेटवर येण्यापासून फिल्मी पार्टीतून बाहेर पडण्यापर्यंत अतिशय वक्तशीर. आणि सतत नवीन गोष्टी जाणून व शिकून घेण्याची प्रवृत्ती. अशीच व्यक्ती ट्विटरवर सर्वाधिक अॅक्टिव्ह राहत विक्रमी लाईक्स व फॉलोअर्स मिळवते. खरंच त्यांना आपण पंचाहत्तरीचा मानायचे काय? सतत नवीन गोष्टीत रस घेणार्‍याच्या वयाची कोणी मोजदाद करूच नये. त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा असतो. स्वतः ‘बिग बी’च सांगतात, आता काम करायचे नाही तर कधी करायचे? यातच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. ते कधी जुनी आठवण वा एखादा एक्सक्लुझिव्ह फोटो पोस्ट करुन फ्लॅशबॅकमध्ये जातात व आपल्यालाही नेतात. तर कधी आज काही विशेष केल्याचे सांगतात. म्हणजेच ते एकाच वेळेस काल, आज व उद्या अशा तीनही स्तरावर जगतात. या एनर्जेटिक वृत्तीला वय नसते अथवा हे सगळेच त्याला फ्रेश व तरुण ठेवते.

दोन आठवणी सांगायला हव्यात.

चार वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’ संपादकीय टीमने त्याच्या जुहूच्या जनक बंगल्यावर त्याच्याशी दीड तास संवाद साधत त्याची विविध संदर्भातील मते/ दृष्टिकोन/ भावना समजून घेतल्या. ‘बिग बी’ने या अनुभवावर ट्वीट केला. यात त्याचा प्रत्येक अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची वृत्ती दिसते.

‘सरकारराज २’च्या निमित्ताने जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील सूटमध्ये आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. तो अनुभव त्यांनी त्या क्षणाच्या छायाचित्रासह पोस्ट केला. दीर्घ कारकिर्दीनंतरही त्याने या गोष्टीचे महत्त्व जाणले हे विशेषच.
नवीन माध्यमाला आपलसं करणे. त्यातून आपली ओळख निर्माण करणे हे मागील पिढीने शिकणे आवश्यक आहे. चित्रपट कलाकार अशा गोष्टींतून समाजासमोर काही आदर्श ठेवत असतात.

पण नवीन माध्यम शिकणे ‘बिग बी’साठी नवीन नाहीच याची तुम्हाला कल्पना आहे ?

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण ‘बिग बी’ छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी कोणत्याही ‘स्टार’ने मोठ्या पडद्यावरून असे उपग्रह वाहिन्यांवर येणे डाऊन मार्केट मानले जात होते. चित्रपटातून मागणी ओसरलेलेच असे छोट्या पडद्यावर येतात असे मानले जाई. म्हणूनच तर ‘कौन बनेगा करोडपती’चे (२०००) भवितव्य काय अशीच शंका होती. अमिताभने तेव्हा आपली गुणवत्ता व छोट्या पडद्याची भाषा समजून घेत आपल्या दर्जेदार कामातून चोख उत्तर दिले. ते मुळचे अलाहाबादचे आणि साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे सुपुत्र, त्यामुळे शुद्ध व अर्थपूर्ण हिंदी हे त्याचे वैशिष्ट्य त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पहिल्याच भागापासून दाखवलं. त्याचे हिंदी भाषेवरचे प्रभुत्व त्याच्या उंची व्यक्तिमत्वाचे सर्वाधिक विशेष. चित्रपटात त्या भूमिकेशी एकरूप व्हावे लागते तर ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपण एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून कार्यरत असून, प्रत्येक स्पर्धकाशी त्याला समजून/सांभाळून घेत संवाद साधून हा खेळ रंगवायला हवा हे त्यांनी सतत दाखवलंय. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तो ‘हॉट सीट’वरील स्पर्धकाशी बोलतानाच अधूनमधून प्रेक्षकांशीही संवाद साधतो. हा समतोल त्याने उत्तम साधला. हे सगळेच नवीन माध्यमातून आपण कसे व्यक्त व्हावे हे सगळेच जाणून घेण्याच्या वृत्तीतून येते. हे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनच करु शकतो. ‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या भागा वेळी ‘बिग बी’चे वय ५८ होते. म्हणजेच साठीच्या जवळच. हे वय नोकरीतून निवृत्त होण्याचे. आयुष्याचा वेग कमी करण्याचे. त्या वयात ‘बिग बी’ नवीन गोष्टीत रस घेत आपली तात्कालिक व्यावसायिक घसरण थांबवत होता. ‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या भागापूर्वी त्यांचे काही चित्रपट फ्लॉप झाल्याने त्याच्या गुणवत्तेवरच काहींनी उगाच शंका व्यक्त केली. तर काहींनी त्याचा काळ संपला म्हटले. पण ‘बिग बी’सारख्याचा फॉर्म जाणे तात्कालिक असते. त्यांची गुणवत्ता योग्य संधीची वाट पाहत असते. आजही म्हणजेच १७ वर्षांनंतरही ‘बिग बी’ मूळ उत्साहातच ‘कौन बनेगा करोडपती’चा खेळ रंगवत आहे. अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ अधूनमधून लहान मोठी गॅप घेतो. पण बिग बींवर त्याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही.

म्हटलं ना, ‘बिग बी’सारख्यांना वाढते वय हे फक्त कॅलेंडरच्या तारखांत असते. त्याचा त्यांच्या कार्यशैलीवर परिणाम होत नाही. आजही पहाटे लवकर उठून ‘बिग बी’ व्यायामशाळेत पहिले पाऊल टाकून स्वतःला फिट ठेवतात. नवीन पिढीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका साकारतात आणि ट्विटरवर देखील पोस्ट टाकतात…
खरंच या माणसाचे वय ७५ झालंय?
(पूर्वार्ध)
– दिलीप ठाकूर