बॉलिवूड चित्रपटांमध्ये कलाकारांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील गाण्यांनाही फार महत्त्व असते. अशाच काही चित्रपटातील गाण्यांमध्ये अभिनेता शाहरुख खानवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच जादू केलीये. त्यातही शाहरुख आणि काजोलवर चित्रित गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केले, असे म्हणायला हरकत नाही. ‘दिलवाले या चित्रपटातील ‘गेरुआ’ हे असेच एक गाणे. पडद्यावर दिसणारी शाहरुख-काजोलची केमिस्ट्री, अरिजित सिंगचा आवाज म्हणजे या गाण्याच्या जमेच्या बाजू. पण, सध्या या गाण्याचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द शाहरुखनेही हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंवरुन ट्विट केला आहे.
या ट्विटमध्ये शाहरुखने त्या आईस्क्रिमवाल्यासोबत ‘गेरुआ’ हे गाणे पुन्हा चित्रित करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. तुर्कीमधील एका आईस्क्रिम विक्रेत्याचा हा व्हिडिओ आणि त्याची हातसफाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्याच्या तालावर तो आईस्क्रिम विक्रेता सुरेख हातचलाखीने समोर उभ्या असलेल्या ग्राहकाच्या हातातील आईस्क्रिमशी खेळताना दिसतो. ज्या चपळाईने तो आईस्क्रिमच्या कोनाशी खेळतोय ती खरच पाहण्याजोगी गोष्ट आहे.
दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला असतानाच शाहरुखनेही या व्हिडिओची प्रशंसा केल्यामुळे ‘गेरुआ’चे हे नवे व्हर्जन अनेकांनाच थक्क करणारे ठरत आहे.
Would've shot Gerua with ice cream instead of going to Iceland had I seen this earlier… Awesome! pic.twitter.com/usmNgu7LDG
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 23, 2017
अभिनेता शाहरुख खान लवकरच इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत.