बॉलिवूडमध्ये विविध कारणांनी सेलिब्रिटींमध्ये खटके उडतच असतात. आता त्यातच आणखी एका वादाची भर पडली आहे. ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडचे दोन आघाडीचे अभिनेते म्हणजेच अभिनेता अजय देवगण ajay devgan आणि खिलाडी अक्षय कुमार akshay kumar यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे. एका सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या मुद्द्यावरुन बी- टाऊनचा सिंघम आणि खिलाडी यांच्यात मतभेद झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच अक्षयने राणीगंज कोळसा दुर्घटना बचावकार्य (१९६९) घटनेची कथा ऐकली होती. जमिनीच्या जवळपास शंभर फूट खाली कोळशाच्या खाणीत ६४ खाणकामगार अडकून पडले होते. या कथेचं महत्त्व आणि प्रभाव पाहता अक्षयने या चित्रपटात काम करण्यासाठीची इच्छाही व्यक्त केली होती.
चित्रपटाच्या कथेचं महत्त्वं लक्षात घेत खिलाडी कुमारने या चित्रपटाचे हक्क अधिकृतपणे खरेदी करण्यासाठीची प्रक्रियाही सुरु केली होती. पण, त्याच्याआधीच अजय देवगणने या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचं त्याच्या लक्षात आलं. राणीगंज कोळसा खाण दुर्घटनेवरील कथेचे सर्व हक्क अजयने जे. एस. गिल यांच्याकडून विकत घेतल्याचं कळत आहे.
वाचा: देवसेनेला हात लावाल, तर महागात पडेल!
दरम्यान, अजयने या कथेचे हक्क विकत घेतल्याचं कळताच अक्की नाराज झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला या दोन्ही अभिनेत्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याची चित्रं पाहायला मिळत आहेत. ‘बॅटल ऑफ सारागढी’ या चित्रपटाच्या बाबतीतही या दोन्ही कलाकरांमध्ये अशीच वादाची भिंत उभी आहे. सलमान खान, करण जोहर यांची निर्मिती असणाऱ्या एका चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अजय देवगणही त्याच धर्तीवर आधारित चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करणार आहे. त्यासोबतच तो या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिकाही साकारणार आहे. त्यामुळे सारागढीच्या युद्धावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या दोन्ही अभिनेत्यांमध्ये एक प्रकारचं शीतयुद्धच सुरु आहे, असं म्हणायला हरकत नाही.