बॉलिवूड अभिनेत्री असिनने एका मुलीला जन्म दिला असून, तिच्या पतीने ही बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. ‘मायक्रोमॅक्स’ कंपनीचा संस्थापक राहुल शर्मा याच्यासोबत असिनने गेल्या वर्षी लग्न केले होते. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीला अलविदा करत कुटुंबावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

कुटुंबवत्सल असिनच्या आयुष्यात तिच्या मुलीच्या येण्याने आता एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. राहुलने मंगळवारी रात्री त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आपल्या कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण करण्यासाठी एका चिमुकलीचे आगमन झाल्याचे जाहीर केले. ‘मला हे सांगताना फार आनंद होतो आहे, की आमच्या आयुष्यात एका परिचे आगमन झाले आहे. गेल्या नऊ महिन्यांचा काळ आमच्यासाठी खूप खास होता. त्या दिवसांमध्ये आम्हाला साथ देणाऱ्यांचे आणि आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो’, असे ट्विट करत राहुलने त्याचा आनंद व्यक्त केला. यानंतर अनेकांनी असिन आणि राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांसाठी असिन ओळखली जाते. आमिरसोबतचा तिचा ‘गजनी’ आणि सलमानसोबतचा ‘रेडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला. याव्यतिरिक्त तिने अक्षय कुमारसोबत ‘खिलाडी ७८६’ या चित्रपटातही काम केले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. पण, चित्रपटसृष्टीत नावारुपास आल्यानंतरच तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या करिअरला थोडे बाजूला सारत कुटुंबाला प्राधान्य दिले. ३१ वर्षीय असिन २०१५ नंतर पुन्हा कधीही चित्रपटांमध्ये झळकली नाही.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

https://www.instagram.com/p/BPbkCpfgeXC/