अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून विविध चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. येत्या काही दिवसांमध्ये तिच्या अभिनयाचे विविध पैलू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. श्रद्धा ज्या वेगाने यशाची वाट चालत आहे ते पाहता इतर अभिनेत्रींना ती चांगलीच टक्कर देईल असं म्हणायला हरकत नाही. कारण, चरित्रपटांमध्ये रमणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाट्याला आणखी एक व्यक्तीरेखा साकारण्याची संधी आली असून, त्यासाठी तिने तयारीही सुरु केली आहे. बॉलिवूडची ही ‘हसीना’ लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘फुलराणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायना नेहवालची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने तयारी सुरु केली असून, तिने नुकतीच या खेळाडूची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. श्रद्धाने या भेटीचे काही सुरेख फोटोसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले. यातील एका फोटोमध्ये सायनाची आई त्या दोघींनाही मोठ्या प्रेमाने जेवण वाढताना दिसत असून, दुसऱ्या एका फोटोमध्ये सायनाचे बाबा फार अभिमानाने आपल्या मुलीला मिळालेल्या पदकांबद्दल श्रद्धाला सांगत आहेत. श्रद्धा कपूर येणार म्हणून सायना नेहवालच्या घरी बरंच उत्साही वातावरण होतं. तिच्या आईने श्रद्धासाठी पूरी, छोले, खीर, हलवा आणि फ्रुट / मिल्क ज्युस असे विविध पदार्थही बनवले होते.
वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?
चरित्रपटाच्या कारणाने का असेना पण, श्रद्धाला सायना नेहवालचं एक वेगळं रुप पाहण्याची संधी मिळाली असं म्हणावं लागेल. सायनाच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमोल गुप्तेंनी घेतली आहे. या चित्रपटासाठी ‘आशिकी गर्ल’ श्रद्धाने बॅडमिंटन या खेळाचं रितसर प्रशिक्षणही घेतलं आहे.