मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. या घटनेवर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यात बॉलिवूड कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे.

“हे खरंच फार भयंकर आणि भीतीदायक आहे. या स्फोटातील पीडित व्यक्तींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं प्रियांका चोप्रा म्हणाली. तर, “जेव्हा तुम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर तुमचा मेंदू विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. बैरुटमधील घटना माझ्या डोक्यातून जाण्याचं नावच घेत नाहीये”, असं फरहान अख्तर म्हणाला.

“भयंकर आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना. बैरुटमध्ये सध्या काय स्थिती असेल याचा विचारह आपण करु शकत नाही”, असं स्वरा भास्कर म्हणाली.


हनी सिंग, सेलिना जेटली निमरत कौर, भूमि पेडणेकर, आयशा टाकिया मौनी रॉय या सारख्या अनेक कलाकारांनी बैरुटमधील घटनेवर भाष्य केलं आहे.

दरम्यान, बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधूस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. आधी मृतांचा आकडा ७० तर जखमींचा आकडा २७५० असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर हा आकडा वाढून चार हजारहून अधिकजण जखमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.