प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नसून अनेकजण सध्या त्याच्या याच शेवटच्या कॉनसर्टमधील व्हिडीओ शेअर करत आहेत.

नक्की वाचा >> मृत्यूच्या काही वेळ आधीच ‘केके’ने Instagram वरुन पोस्ट केलेले दोन फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाला होता, “आज रात्री…”

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. केकेच्या मृत्यूनंतर गुरुदास कॉलेजमधील त्याच्या कॉन्सर्टचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

याच कॉलेजच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये केके ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. ‘यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…’ हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.

केकेच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार असून हे तिघेही आज सकाळी कोलकात्यामध्ये दाखल होत असल्याची माहिती समोर आलीय.