आमिर खानचा ‘३ इडियट्स’ चित्रपट पाहिलाय? या चित्रपटातील विनोदी मदतनीस मिलिमीटरची भूमिका करणारा अभिनेता तुम्हाला आठवतोय का? २००९ मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटात अभिनेता राहुल कुमारने हे पात्र साकारले होते. चित्रपटात राहुल कुमारचे मोजकेच पण मजेशीर डायलॉग्स होते. त्याने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली होती.

‘३ इडियट्स’मध्ये काम केलं तेव्हा राहुल कुमार फक्त १६ वर्षांचा होता. आता तो मोठा झाला आहे. इतकंच नाही तर त्याने विदेशी तरुणीशी लग्न देखील केलं आहे. राहुल कुमारने केझिबन दोगान या तुर्कीच्या तरुणीशी लग्न केलं असून दोघेही आनंदाने संसार करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे राहुल व केझिबन यांची प्रेमकहाणी ‘३ इडियट्स’मुळेच सुरू झाली.

सोशल मीडियावर राहुल व त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल आणि त्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ नवी दिल्लीतील एका पोर्ट्रेट फोटोग्राफरने काढला. जोडप्यांचे कँडिड फोटो काढणाऱ्या या फोटोग्राफरने राहुलला त्याच्याबद्दल विचारलं. “मी राहुल आहे, ती माझी पत्नी केझिबन दोगान आहे आणि ती तुर्कीची आहे,” असं तो म्हणाला. त्यावर त्याची पत्नी हसत “हो, आम्ही ४ मे रोजी लग्न केलं आहे,” असं म्हणाली.

राहुल व केझिबनची लव्ह स्टोरी

केझिबनने ‘३ इडियट्स’मध्ये राहुलचं काम पाहिलं होतं. राहुलने साकारलेली मिलिमीटरची भूमिका पाहिल्यानंतर तिने राहुलशी संपर्क साधला. “मी हा चित्रपट पाहिला, त्यात त्याने मिलिमीटरची भूमिका केली आहे. मला वाटतं बहुतेक १४ वर्षांपूर्वी मी त्याला मेसेज केला आणि आम्ही बोललो,” असं केझिबनने सांगितलं. त्यानंतर राहुलने फोटोग्राफरला विचारलं की त्यांच्या कपाळावरील टीका नीट दिसत आहेत का. राहुलने पांढरा शर्ट आणि बेज रंगाची पँट घातली होती, तर त्याची पत्नी केझिबन लाल रंगाच्या सूट सेटमध्ये होती. व्हिडीओच्या शेवटी या जोडप्याचे सुंदर फोटोही पाहायला मिळतात.

‘मिलिमीटर’ म्हणजेच राहुल कुमारला तब्बल ​​१६ वर्षांनंतर पाहून चाहते खूपच खूश झाले आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. अनेक चाहत्यांनी व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या भूमिकेबद्दल लिहिलंय. “मिलिमीटर आता किलोमीटर झाला आहे,” अशी कमेंट एका युजरने केली. तर, “ती भूमिका कधीच विसरू शकत नाही,” असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

केझिबन व राहुल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ४ मे रोजी लग्न केलं. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने लग्न केलं. राहुल कुमारने जून महिन्यात इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आणि “My forever” असे कॅप्शन दिले.

पाहा फोटो

राहुल कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ३ इडियट्स व्यतिरिक्त, बंदिश बॅन्डिट्स, कॅम्पस बीट्स आणि संदीप और पिंकी फरार यासह इतर प्रोजेक्ट्स देखील केले आहेत.