Aamir Khan and Family Issue statement Dismissing Brother Faisal Khan’s Claim : आमिर खान सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचा भाऊ अभिनेता फैजल खानने आमिर व कुटुंबीयांवर आरोप केले होते. त्याने व कुटुंबीयांनी त्याला वर्षभर कोंडून ठेवलेलं असं म्हटलं होतं. अशातच आता खान परिवारानं हे आरोप नाकारत त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खानचा भाऊ फैजल खान हादेखील एक अभिनेता आहे. त्यानं नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यानं आमिर खान, त्यांची आई व बहीण यांच्यावर आरोप केले होते. आता त्याच्या कुटुंबीयांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं असून, ते काय म्हणालेत ते जाणून घेऊयात…
फैजल खानने भाऊ आमिर खान व कुटुंबीयांवर केलेले आरोप
फैजल खाननं मुलाखतीत, “त्यांनी मला एक वर्ष घरात कोंडून ठेवलं. मला स्किझोफ्रेनिया असून, मी वेडा आहे आणि याचा समाजाला त्रास होऊ शकतो, असं सांगितलं. जे जे रुग्णालयात मला २० दिवस ठेवण्यात आलेलं आणि तेथील जनरल वॉर्डमध्ये माझ्यावर टेस्ट करण्यात आल्या”, असं म्हणत खान कुटुंबीयांवर आरोप केले होते.
खान कुटुंबीयांची प्रतिक्रिया
खान कुटुंबीयांनी फैजलनं केलेले आरोप नाकारत, ते सगळे त्याच्यामुळे दुखावले गेले असल्याचं सांगितलं आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार खान कुटुंबीय म्हणाले, “आम्ही फैजलनं केलेल्या आरोपांमुळे दुखावले गेले आहोत. हे पहिल्यांदा घडत नसून, त्यानं यापूर्वीसुद्धा अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत. आम्हाला कुटुंब म्हणून याबद्दल स्पष्टीकरण देणं आणि अशा गोष्टींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणं गरजेचं वाटतं.”
पुढे त्यांनी, “फैजलसंदर्भात घेण्यात आलेला प्रत्येक निर्णय संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र बसून घेतला होता. वैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्याच्यासंदर्भात सर्व निर्णय घेण्यात आलेले. त्यामागे केवळ त्याच्याबद्दल प्रेम, मानसिकदृष्ट्या त्याला बरं वाटावं हाच उद्देश होता. याच कारणामुळे आम्ही कधीही उघडपणे याबद्दल कोणाशी चर्चा केली नाही.” खान कुटुंबीयाने पुढे, “आम्ही माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी याबद्दल कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या अफवा पसरवू नयेत.”
दरम्यान, अभिनेता लवकरच ‘कुली’ चित्रपटातून झळकणार आहे. येत्या १४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्यासह आमिर सध्या त्याच्या काही इतर आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. त्यामध्ये त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’ चाही समावेश आहे.