Sitaare Zameen Par Poster Launch: आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची सध्या गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पोस्टर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
२००७ साली आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. आजही ‘तारे जमीन पर’ हा उत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आता ‘सितारे जमीन पर’ हा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
चित्रपटाच्या पोस्टरमधून आमिर खान बास्केटबॉलच्या शिक्षकाच्या भूमिकेत असणार असल्याचे दिसत आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात अभिनेता कलेचा शिक्षक होता. पोस्टरमध्ये आमिर खानबरोबरच आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे कलाकारदेखील दिसत आहेत
‘सितारे जमीन पर’च्या पोस्टरची झलक दिसण्याबरोबरच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हेदेखील समोर आले आहे. हा चित्रपट २० जून २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. “चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहोत”, “बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणार”, “चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहोत”, “आमिर खान अर्थपूर्ण गोष्टी आणण्यात कधीही विसरत नाही”, “२०२५ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे”, “२०२५ मधील हा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल,” असे म्हणत चाहत्यांनी ‘सितारे जमीन पर’ चित्रपट पाहण्यास उत्सुक असल्याचे लिहिले आहे.



या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेशमुखदेखील दिसणार आहे. आमिर खान बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे, त्यामुळे त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट आर एस प्रसन्न यांनी दिग्दर्शित केला आहे. आता हा चित्रपट ‘तारे जमीन पर’सारखाच लोकप्रिय ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.