‘द परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींसाठी ओळखला जातो. ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘३ इडियट्स’, ‘पी.के’, ‘दंगल’ यांसारख्या वेगळेपण असलेल्या चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये त्यानं एकापेक्षा एक अशा भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता आमिर खान लवकरच एका अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं म्हटलं जातंय. आमिर खान सध्या त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम करीत आहे.
या चित्रपटाचं काम लवकरच सुरू होणार असून, आता नुकतंच आमिरनं ‘महाभारत’ या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. ‘एबीपी लाइव्ह’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यानं सांगितलं, “महाभारतावर आधारित चित्रपट बनवणं हे माझं स्वप्न आहे; पण हे खूप कठीण काम आहे”. तर मागे एका मुलाखतीमध्ये त्यानं, “या चित्रपटाचं लिखाण पूर्ण व्हायलाच दीड-दोन वर्षं लागतील. त्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि या चित्रपटाचे काही भाग असतील. तसेच, यासाठी आम्हाला काही दिग्दर्शकांची मदत लागेल”, असं म्हटलं होतं.
या वेळीच त्याला ‘महाभारत’मधील कोणतं पात्र साकारायला आवडेल असं विचारलं असताना त्यानं, “मला श्रीकृष्णांचं पात्र साकारायला आवडेल. त्यांचा माझ्यावर खूप जास्त प्रभाव आहे. त्यामुळे जर कुठलं पात्र साकारायचं असेल, तर श्रीकृष्णांचं पात्र साकारायला मला नक्कीच आवडेल”, असं म्हटलं आहे. परंतु, पुढे त्यानं याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याचं म्हटलं आहे. “महाभारताचं महत्त्व मोठं असून या चित्रपटातून आपण जगाला दाखवून देऊ की आपल्याकडे काय आहे”, असंही म्हटलं.
दरम्यान, आमिर खाननं आजवर त्याच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. आता अभिनेता लवकरच ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा पुढचा भाग ‘सितारे जमीन पर’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री जिनिलीया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सितारे जमीन पर’ हा २००७ साली आलेल्या ‘तारे जमीन पर’चा दुसरा भाग आहे. २० जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.