Aamir Khan Has 12 Luxury Apartment’s In Bandra : बॉलीवूड अभिनेता आमिर खान कुठल्या न कुठल्या कारणाने प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. अशातच आता तो सध्या चर्चेत आलाय ते त्याने भाड्याने दिलेल्या त्याच्या फ्लॅट्समुळे. अभिनेत्याचे मुंबईत अनेक फ्लॅट्स असून, त्यासाठी त्याने आकारलेल्या भाड्याची रक्कमही बरीच मोठी आहे.
आमिर खानचे मुंबईतील वांद्रे परिसारात विरगो सोसायटीमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत. सध्या त्या इमारतीचे काम सुरू असल्याने अभिनेता दुसरीकडे राहत आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार तो राहत असलेल्या इमारतीचे नूतनीकरण करून तिथे आलिशान फ्लॅट्स बांधण्याचं डेव्हलपरचं नियोजन असल्याचे म्हटले जात आहे. अहवालानुसार या इमारतीत आमिर खानचे तब्बल १२ फ्लॅट्स आहेत.
आमिर खानने भाड्याने दिले ४ आलिशान फ्लॅट्स
आमिर खान सध्या राहतो त्याच परिसरात शाहरुख खानचेही घर आहे. त्याच्या मन्नत या आलिशान बंगल्याचे काम सुरू असल्याने तो सध्या वांद्रे येथील पूजा कासा इमारतीत राहत आहे. आमिर खानने वांद्रे येथील त्याचे ४ आलिशान अपार्टमेंट्स भाड्याने दिले असून, दर महिन्याला तो त्या भाड्यांतून २४.५ लाख इतकी रक्कम मिळवणार आहे.
(Zapkey.com)च्या माहितीनुसार अभिनेत्याने ४५ महिन्यांचा हा करार केला आहे. २०२५ ते २०३० अशा कालावधीत त्याचे अपार्टमेंट्स त्याने भाड्याने दिले आहेत. या करारात १.४६ कोटींची सुरक्षा ठेवसुद्धा समाविष्ट आहे; तर स्टँप ड्युटीसाठी चार लाख व रजिस्ट्रेशनसाठी २,००० अशी रक्कम आहे. त्याशिवाय या अपार्टमेंट्सचे भाडे दर वर्षी पाच टक्क्यांनी वाढणार असल्याचंही अॅग्रीमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शाहरुख खाननेही वांद्रे येथील पूजा कासा इमारतीत दोन ड्युप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. ज्याचे वर्षाचे एकूण भाडे २.९ कोटी इतके आहे. पूजा कासा येथील हे अपार्टमेंट अभिनेता जॅकी भगनानी, त्याची बहीण दीपशिखा देशमुख व वडील निर्माते वाशू भगनानी यांच्या नावे आहेत.
दरम्यान, आमिर खान सध्या ‘कुली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात आमिर खानही झळकणार आहे. येत्या १४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.