Aamir Khan Makes Vada Pav On Mumbai Streets: बॉलीवूड अभिनेता आमिर खान हा त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरचे प्रेक्षकांकडून कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आता आमिरच्या चित्रपटाची नाही तर त्याच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा होताना दिसली. आमिर खान रस्त्यावर वडापाव विकताना दिसला. सोशल मीडियावर आमिर खानचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ दादर येथील आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की आमिर खान वडापाव बनवत आहे. तो हसत असल्याचेदेखील दिसते. त्याच्याभोवती गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. गर्दीमधील एक व्यक्ती म्हणतो की, यामध्ये हिरवी मिर्ची नाही ना, मी इथून घेतो.
आमिर खानचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्याची चित्रपटाची प्रमोशन करण्याची पद्धत चांगली असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “त्याच्या प्रमोशनच्या रणनीतीला कोणीही हरवू शकत नाही.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे अनिर्वाय आहे.”


९ जूनला ‘सितारे जमीन पर’चे स्क्रिनिंग झाले, त्यावेळी आमिर खानने हजेरी लावली होती. आमिरला पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, हा चित्रपट ऑटिझम आणि डाऊन सिंड्रोम असणाऱ्यांप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करेल. तर आणखी एका चाहत्याने लिहिले, “आमिर खानचा २००७ पासूनचा हा सर्वोत्तम चित्रपट आहे.”
आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’मध्ये जिनिलीया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आणि नवोदित नमन मिश्रा, ऋषी शहानी, आरुष दत्ता, गोपी कृष्णन वर्मा, वेदांत शर्मा, ऋषभ जैन, आशीष पेंडसे, संवित देसाई, सिमरन मंगेशकर आणि आयुष भन्साळी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आमिर खान दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. २००७ साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.