रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे. प्रेक्षकांना चिथावणाऱ्या या अशा धाटणीच्या चित्रपटांबद्दल आमिर खानचं जुनं वक्तव्य या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलं आहे.

या व्हिडीओ क्लिपमध्ये आमिरने हिंसा आणि सेक्स या गोष्टी चित्रपटात दाखवण्याबद्दल आक्षेप घेतला असून त्याने यावर टीका केली आहे. मुलाखतीदरम्यान आमिर म्हणाला, “प्रेक्षकांना चिथावण्यासाठी त्यांच्या काही भावनांना हात घालणं फार सोप्पं आहे. सेक्स आणि हिंसा या त्या भावनांपैकीच दोन महत्त्वाच्या भावना आहेत. जर दिग्दर्शक फार टॅलेंटेड नसेल अन् त्याला कथा रंगवून मांडता येत नसेल तर चित्रपट चालण्यासाठी तो हिंसा आणि सेक्स या गोष्टींचा आधार घेतो.”

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ करणार बॉलिवूडला राम राम; ‘या’ कारणासाठी अभिनेत्री घेत आहे अभिनयातून संन्यास

पुढे आमिर म्हणाला, “त्यांना वाटतं की आपण चित्रपटात सेक्स आणि हिंसा यांचा भडिमार केला तर चित्रपट यशस्वी होईल. परंतु हे योग्य नव्हे. असं करून त्यांना कदाचित यश मिळेलही पण यामुळे ते समाजाचं फार मोठं नुकसान करत आहेत. मला ही गोष्ट पटत नाही, कारण चित्रपटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांची एक सामाजिक बांधिलकी असते असं मला वाटतं. माझं असं म्हणणं अजिबात नाही की हिंसा ही चित्रपटात नसावी, ती त्या विषयावर अवलंबून असावी अन् ते सादर करायचीदेखील एक पद्धत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये वडील-मुलाच्या एका विचित्र नात्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटात भरपुर बोल्ड सीन्स, किसिंग सीन्स तसेच रक्तपात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे या चित्रपटावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. चित्रपटात रणबीरसह रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, शक्ति कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.