अभिनेता आमिर खानची मुख्या भूमिका असलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. लहान मुलाचं भावविश्व या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. या चित्रपटात डिस्लेक्सिया (Dyslexia) हा आजार असणाऱ्या एका लहान मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील डिस्लेक्सिया आजार असलेल्या लहान मुलाला आमिर खान सांभाळून घेत असल्याचं कौतुक झालं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का? आमिर खानच्या स्वत:च्या लेकालादेखील डिस्लेव्हिया हा आजार होता
त्यावेळी आमिरला या आजाराबद्दल माहिती नसल्याने तो चित्रपटातील नंदकिशोर अवस्थीसारखा लेक जुनैदला रागवायचा. याबद्दल स्वत: आमिरनेच सांगितलं आहे. सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात, आमिर खानने त्याचा मुलगा जुनैदला लहानपणी डिस्लेक्सिया हा आजार असल्याचं सांगितलं. तसंच त्याकाळात आमिर त्याच्या लेकासाठी कठोर पिता होता आणि तो सुरुवातीला नंदकिशोर अवस्थीसारखा (तारे जमीन परमधील वडील) वागत होता. तो जुनैदला खूप ओरडायचा.
याबद्दल आमिरने सांगितलं, “मी आजपर्यंत याबद्दल कधीच बोललो नाही. कदाचित मी हे पहिल्यांदाच बोलत आहे. या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. जुनैद डिस्लेक्सिक आहे. म्हणून जेव्हा मी पहिल्यांदा (तारे जमीन परची) कथा ऐकली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण मी स्वतः यातून गेलो आहे. मी सुरुवातीला नंदकिशोर अवस्थी (तारे जमीन परचे वडील) सारखा होतो. मी जुनैदवर खूप रागवायचो. त्याचं अक्षर खराब असल्याबद्दल मी त्याला ‘कोणी इतके वाईट कसे लिहू शकते?’, ‘हे कोणी वाचूही शकत नाही’ असं ओरडायचो.”
यापुढे आमिरने म्हणाला, “जुनैद जेव्हा वाचायचा तेव्हा तो ‘फॉर’ ऐवजी ‘फ्रॉम’ म्हणायचा. तो नीट वाचू शकत नव्हता. म्हणून मी त्याला गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो आणि मीही गोंधळून जायचो की, इतक्या साध्या गोष्टी त्याला कशा समजत नाहीत? नंतर आम्हाला कळलं की, त्याला डिस्लेक्सिया आजार आह. मग नंतर आम्ही त्याला यातून बाहेर येण्यास मदत केली. त्यामुळे मी ‘तारे जमीन पर’ची कथा ऐकली, तेव्हा ती माझ्या आयुष्यातील कथेसारखीच वाटली. कारण ती कथा माझ्या खूप जवळची होती.”
काही दिवसांपुर्वी जुनैद खानने विवेक लालवानीच्या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये जुनैदने त्याला लहाणपणी झालेल्या डिस्लेक्सिया आजाराबद्दल खुलासा केला होता. दरम्यान, आमिर आता ‘तारे जमीन पर’चा पुढील चित्रपट ‘सीतारे जमीन पर’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर जिनिलीया देशमुखदेखील मुख्य भूमिकेत आहे.