Aamir Khan Reacts to His Divorce : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक जण या चित्रपटाची प्रशंसा करीत आहेत. चित्रपटाचे विषय, त्यातील आशय व आपला अभिनय यांमुळे चर्चेत राहणारा आमिर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत आमिरने त्याच्या त्याच्या पूर्वपत्नी किरण राव व रीना दत्ता यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच अभिनेत्याने त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटबद्दलही सांगितले. यावेळी आमिरने सांगितलं की, घटस्फोटानंतरही किरण राव व रीना दत्ता यांच्यावरील प्रेम आणि आदर अजूनही तसाच आहे. त्यात काहीच फरक किंवा बदल झालेला नाही.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “रीना आणि किरण दोघीही माझ्या आयुष्यातल्या उत्तम महिला आहेत. त्यामुळे घटस्फोटानंतरही आमच्या नात्यावर काही परिणाम झालेला नाही. त्यामुळे जेव्हा मी रीना व किरण यांच्यापासून घटस्फोट घेतला, तेव्हा आम्ही वेगवेगळे वकील न ठेवता, एकच वकील ठेवला होता. आमच्यात कोणतंही भांडण झालं नाही, आम्ही फक्त दोन व्यक्ती म्हणून वेगळे झालो; शत्रू म्हणून नाही.”
मदतीच्या काळात रीना आणि किरण मदतीसाठी धावून येतात : आमिर खान
पुढे आमिरने असेही सांगितले, “आजही एखाद्या कठीण किंवा मदतीच्या काळात रीना आणि किरण मला मदत करण्यासाठी धावून येतात.” त्याबद्दलची एक आठवणही त्याने सांगितली, “जेव्हा रीनाचे वडील आजारी होते. तेव्हा त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. तेव्हा रीनानं मला फोन केला. त्यावर मी त्यांना त्यांच्या कर्करोगाचे उपचार घेण्यासाठी तयार केलं होतं.”
त्यानंतर आमिर म्हणाला, “आयराच्या लग्नातही आम्ही सगळे एकत्र आलो होतो. तेव्हा मला जाणवलं की, हे खूप दुर्मीळ आहे. गेल्या काही वर्षांतील थेरपीमुळे मी आता भावनिकदृष्ट्या अधिक समंजस झालो आहे, असं मलं वाटतं. त्यामुळे आता गौरीला एक बदललेला आमिर भेटला आहे, जो खूप शांत आणि संयमी आहे.” दरम्यान, आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवशी गौरीबरोबरच्या नात्याबद्दलची जाहीर कबुली दिली.
आमिरने त्याच्या आयुष्यातील नव्या प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितल्यावर आमिर व गौरी अनेकदा एकत्र दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या ‘सितारे जमीन पर’च्या स्क्रीनिंगला गौरीने हजेरी लावली होती. यावेळी गौरी सुंदर साडी नेसून पोहोचली होती. यावेळी आमिरने गौरीचा आणि किरणचा मुलगा आझादचा हात घट्ट पकडल्याचे काही फोटो व व्हिडीओ पाहायला मिळाले होते.