Aamir Khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर उशिरा आणि ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे आमिरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पहलगाम हल्ला झाल्यावर जवळपास आठवड्यानंतर अभिनेत्याने या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला होता. याबाबत अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

आमिर खान सध्या ‘सितारे जमीन पर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याने नुकतीच ‘आप की अदालत’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी “अनेकांचं असं म्हणणं आहे की, आमिर खान आपल्या चित्रपटात पाकिस्तानचं नाव घेत नाही. काही लोकांनी असंही लिहिलंय की, आमिर त्या देशातील दहशतवादावर देखील कधीच काही बोलत नाही. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?” असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला. यावर आमिरने सर्वात आधी पाकिस्तान हा शब्द ‘सरफरोश’ या सिनेमात वापरला गेल्याचं सांगितलं. हा सिनेमा १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी देशात वाजपेयी सरकार होतं.

यावर आमिर खान म्हणाला, “आपण जर भारतीय चित्रपटांचा इतिहास पाहिला तर, आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल. सेन्सॉर बोर्डाने आम्हाला कधीच त्यांचं नाव वापरण्याची परवानगी दिली नव्हती. ‘पडोसी मुल्क’ ( शेजारचा देश ) असा उल्लेख चित्रपटांमध्ये केला जायचा. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल जुन्या चित्रपटांमध्ये भारताशेजारी असलेल्या देशाने हल्ला केला, शेजारच्या देशाने असं केलंय असे संदर्भ चित्रपटांमध्ये दिले जायचे. पण, तुम्हाला माहितीये का? माझा जो ‘सरफरोश’ चित्रपट आहे…तो भारतीय सिनेमाच्या इतिहासातील असा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये आम्ही थेट पाकिस्तान आणि ISI चं नाव घेतलं आहे.”

“चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मला म्हणाले होते की, सेन्सॉर बोर्ड हे पास करणार नाही. मी म्हणालो, ‘का नाही करणार? आपण त्यांना समजावून सांगू’ जर संसदेत अडवाणीजी पाकिस्तानचा उल्लेख करत आहेत आणि ISI आपल्या देशात दहशतवाद पसरवतंय असं सार्वजनिकरित्या बोललं जात असेल. तर, आपण सिनेमात याबद्दल का बोलू शकत नाही? आणि याच आधारावर आम्हाला पाकिस्तानचं नाव वापरण्याची परवानगी सेन्सॉरने दिली.” असं आमिरने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता पुढे म्हणाला, “सरफरोश’नंतर प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये पाकिस्तानचं नाव वापरलं गेलं. पण, पाकिस्तानचं नाव थेट वापरणारा ‘सरफरोश’ हा पहिला सिनेमा होता. लोक म्हणतात की, मी पाकिस्तानविरुद्ध बोलत नाही… पण, मीच त्यांचं सगळ्यात आधी माझ्या सिनेमात नाव घेतलंय मग, मी असं का करेन? ‘सरफरोश’नंतर माझ्यावर पाकिस्तानातून खूप टीका करण्यात आली होती. तुम्हाला माझा ‘दंगल’ सिनेमा माहिती असेल, त्यावेळी पाकिस्तानच्या सेन्सॉरकडून आपलं ( भारताचं ) राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज क्लायमॅक्समध्ये नको अशी मागणी करण्यात आली होती. मला जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा पुढच्या क्षणाला मी जराही विचार न करता, हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित करू नका काहीही झालं तरी क्लायमॅक्स बदलला जाणार नाही, असं सांगितलं होतं.”