मागच्या काही वर्षांपासून जुने चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. आता ३० वर्षांपूर्वीचा एक चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खान, उर्मिला मातोंडकर व जॅकी श्रॉफ यांचा ‘रंगीला’ हा चित्रपट बरोबर ३० वर्षांनंतर २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट 4K HD रिस्टोअर्ड व्हर्जनमध्ये पाहता येईल.

‘रंगीला’च्या री-रिलीजच्या वृत्ताने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल ३० वर्षांनी हा चित्रपट आताच्या पिढीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ हा चित्रपट पहिल्यांदा १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले होते. सुंदर गाणी, भावनिक कथा यामुळे प्रेक्षकांना तेव्हा हा चित्रपट खूप भावला होता.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यासंदर्भात एक अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. “रंगीला चित्रपटाने दाखवून दिले की सामान्य लोकही मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करू शकतात. रुलब्रेकिंग सिनेमा हा सर्वात अविस्मरणीय असतो हेही या सिनेमाच्या यशातून दिसून येतं,” असं वर्मांनी म्हटलंय.

अल्ट्रा मीडियाचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल रंगीलाच्या री-रिलीजबद्दल म्हणाले, “खूप लोकांसाठी ‘रंगीला’ हा बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील एक आठवणींचा प्रवास आहे. अल्ट्रा रिवाइंडसह, आम्ही हा लोकप्रिय क्लासिक सिनेमा आताच्या प्रेक्षकांसाठी 4K स्वरूपात आणत आहोत, जेणेकरून तो येत्या काही वर्षांपर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहील.”

रंगीलाचे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन

रंगीला चित्रपट १९९५ मध्ये सुपरहिट ठरला होता. रंगीलाचे बजेट ४.५ कोटी रुपये होतं. रंगीला चित्रपटाने ३० वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर ७१ लाख रुपयांची ओपनिंग केली होती. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २.०५ कोटी रुपये आणि पहिल्या आठवड्यात ३.७३ कोटी रुपयांची कमाई केली होती. रंगीलाने देशभरात एकूण २०.२२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. रंगीलाने बजेटच्या पाचपट कमाई केली होती.

आता रंगीला पुन्हा एकदा प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहू शकतील. जुन्या पिढींसाठी हा अनुभव आठवणींना उजाळा देणारा ठरेल. तर नव्या पिढीला तरुणपणीचे आमिर खान, उर्मिला मातोंडकर व जॅकी श्रॉफसह इतर कलाकारांचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.