अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर अभिनेता व स्टँड-अप कॉमेडियन आहे. नुकताच आर्यने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात घरातील काही सदस्यांबद्दल त्याने विनोद केले. आर्यचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं, पण लग्नात बब्बर कुटुंबाला निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्याबद्दल वडील राज बब्बर यांनी कशी प्रतिक्रिया दिली, ते आर्यने व्हिडीओत सांगितलं. तसेच आर्यची आई नादिरा बब्बर ज्या एक मुस्लीम आहेत, त्या सावत्र मुलाच्या (प्रतीकच्या) लग्नासाठी पंजाबी शिकत आहेत आणि बहीण जुही बब्बर लाडू बनवतेय असं गमतीत तो म्हणाला.

‘बब्बर साब’ या चॅनलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये आर्यने त्याचे वडील राज बब्बर व स्मिता पाटील यांच्या नात्याचा उल्लेख केला. लहान वयात पत्रकारांनी स्मिता पाटीलबरोबरच्या त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दल प्रश्न आर्यला विचारला होता. विवाहित राज बब्बर स्मिता यांच्या प्रेमात पडले होते. दोघांही लग्नही केलं आणि त्यांना मुलगा झाला. पण बाळंतपणातच स्मितांचा मृत्यू झाला. यानंतर राज पुन्हा नादिराजवळ गेले. आर्य म्हणाला, “मी ६-७ वर्षांचा होतो तेव्हा मला लपाछपी खेळायला आवडायचं, पण मी माझ्या मित्रांसोबत लपाछपी खेळत नव्हतो, मी मीडियाबरोबर खेळत होतो. ते कुठूनही अचानक यायचे आणि मला विचारायचे, ‘तुझ्या वडिलांचे अफेअर आहे. तर तुला कसं वाटतं?'”

आर्य बब्बर राज बब्बर व स्मिता पाटीलबद्दल म्हणाला…

आर्य नंतर वडील राज बब्बर व स्मिता पाटील यांच्याबद्दल बोलताना गंभीर झाला. “प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास ते अफेअर नव्हतं. तर पप्पा आणि स्मिता माँ यांना एकमेकांबद्दल वाटणारं ते खरं प्रेम होतं. एक कुटुंब म्हणून आम्ही ते नातं समजून घेतलं आणि त्याचा आदर केला आणि ते स्वीकारलं. पण जेव्हा तुम्ही ६-७ वर्षांचे असता तेव्हा तुम्हाला हे सर्व समजत नाही. आणि त्यामुळेच माझं वडिलांशी असलेलं नातं ताणलं गेलं. मी त्यावेळी समजू शकत नव्हतो, त्यामुळेच ते झालं,” असं आर्य म्हणाला. पुन्हा तो विनोद करत म्हणाला, “आता मी ४३ वर्षांचा आहे आणि माझ्या लग्नाला ८-९ वर्षे झाली आहेत, आता मला समजलंय की ती माझे वडील फार चुकीचे नव्हते.”

View this post on Instagram

A post shared by Arya Babbar (@aaryababbar222)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओत आर्यने सावत्र भाऊ प्रतीकवरील त्याचं प्रेम व्यक्त केलं. “त्या नात्यामुळे मला माझा लहान भाऊ मिळाला. माझ्या घरात माझं सर्वात जास्त कुणावर प्रेम असेल तर तो माझा लहान भाऊ आहे,” असं आर्य म्हणाला. दरम्यान, प्रतीकने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं, पण लग्नात वडील राज बब्बर, भाऊ आर्य बब्बर किंवा कोणत्याच सदस्याला बोलावलं नव्हतं.