गेल्या काही वर्षांत हिंदी गाणी पुन्हा नव्या पद्धतीने संगीतबद्ध करून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. बॉलीवूडची अशी अनेक जुनी हिंदी गाणी आहेत, जी रिमेक होऊन रसिकांच्या भेटीला आली. यापैकी काही जुन्या गाण्यांचा रिमेकला प्रेक्षकांनी पसंती दाखवली. पण काही गाणी मात्र प्रेक्षकांनी नापसंत ठरवली. अशातच आता आणखी एका गाजलेल्या जुन्या हिंदी गाण्याचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे गाजलेलं लोकप्रिय हिंदी गाणं म्हणजे सलमान खानच्या ‘बिवी नंबर १’ या चित्रपटातील ‘चुनरी-चुनरी’. सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्यावर हे मूळ गाणं चित्रीत झालं आहे. अशातच वरुण धवनचा आगामी चित्रपट येतोय, ज्याचं नाव आहे ‘जवानी तो इश्क होना है’. या चित्रपटातील वरुणचा मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडेबरोबरचा ‘चुनरी चुनरी’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वरुण, मृणाल आणि पूजा यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे ‘चुनरी चुनरी’ हे जुनं गाणं पुन्हा एकदा रिमेक होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर मूळ गाण्याचे गायक अमिताभ भट्टाचार्य यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी रिमेकमुळे मूळ गाण्याचं महत्त्व कमी होत नसल्याचं म्हटलं. शिवाय मी अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकत नाही असंही म्हटलं.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गायक अमिताभ भट्टाचार्य म्हणाले, “चित्रपटाच्या दिग्दर्शकाने किंवा संगीतकाराने मला सांगितलं नाही की, ‘चुनरी चुनरी’ हे गाणं रिमेक केले जात आहे आणि मला सांगण्याची ते हिंमतही करू शकत नाहीत.” यापुढे ते म्हणाले, “माझ्यासाठी ‘चुनरी चुनरी’ हे कधीच उत्तम गाणं नव्हतं. हे गाणं अशा गाण्यांपैकी होतं, जिथे निर्मात्यांना फक्त गाण्याचे बोल हिट व्हायला होते.”

यानंतर अभिजीत भट्टाचार्य जुनं गाणं रिमेक होण्याच्या ट्रेंडबद्दल असं म्हणाले, “मला अशा छोट्या छोट्या गोष्टींची पर्वा नाही. मी या सगळ्या गोष्टींत पडत नाही. बाजारात मूळ प्रतींपेक्षा जास्त नकली प्रती विकल्या जातात. पण त्यामुळे मूळचे महत्त्व कधी कमी होत नाही. खऱ्या गोष्टीचं महत्त्व हे फक्त महान लोकांनाच कळतं. त्यामुळे मी अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्या १९९९ मध्ये आलेल्या ‘बिवी नंबर १’ या चित्रपटातील हे सदाबहार गाणं आजही प्रेक्षकांच्या हृदयाजवळ आहे. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं वाजतं. ‘चुनरी चुनरी’ या मूळ गाण्याचे गायक अभिजीत भट्टाचार्य आणि अनुराधा श्रीराम आहेत. संगीतकार अन्नू मलिक यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर समीर यांनी या गाण्याचे शब्दबद्ध केलं आहे.