This Director Talk’s About Abhishek Bachchan’s Movies : अनेकदा आई-वडील अभिनय श्रेत्रात असले की, त्यांच्या मुलांसाठी या क्षेत्रात येण्याचा मार्ग इतरांच्या तुलनेत सोपा होतो परंतु, असं असलं तरी प्रत्येकाला यश मिळतं किंवा प्रत्येक सुपरस्टारचं मूलही स्टार होईल याची काही शाश्वती नसते असंच काहीसं झालेलं अभिषेक बच्चनबरोबर. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शकानेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. प्रल्हाद कक्कर ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार होते. पूर्वी त्यांनी अभिषेक फक्त अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने बॉक्स ऑफिसवर त्याचा रेकॉर्ड खराब असतानाही तो या क्षेत्रात टिकून असल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली होती.

अभिषेक बच्चनबद्दल दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

प्रल्हाद यांनी आता त्याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, अभिषेक व ऐश्वर्या यांच्याबरोबर ते चित्रपट बनवू शकले नाही याचं मुळ कारण चित्रपटाचे निर्माते होते. त्यानंतर ऐश्वर्याला अभिषेकबरोबर काम करण्याची इच्छा नव्हती. असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे अभिषेक बच्चनबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “मला असं वाटतं अभिषेक एक उत्तम अभिनेता आहे. पण तो खूप आळशी आहे.”

अभिषेकबद्दल पूर्वी केलेल्या टीकेबद्दल ते म्हणाले, “मी इंडस्ट्रीबद्दल चर्चा केलेली. मी म्हटलेलं ही इंडस्ट्री नाही आहे. हे आई-वडिलांचं दुकान आहे. ही इंडस्ट्री कशी असू शकते? कलाकार, दिग्दर्शक सगळे त्यांच्या कुटुंबातील कोणाला तरी काम देतात. जर अभिषेक बच्चनच्या जागी दुसऱ्या कोणाचे १७ चित्रपट फ्लॉप झाले असते तर त्याला तरीसुद्धा इंडस्ट्रीत इतकी कामं मिळाली असती का?”

प्रल्हाद कक्कर यांनी केलेल्या टीकेनंतर अभिषेक बच्चननेही त्यांना स्पष्ट उत्तर दिलेलं. तो म्हणालेला, “मला प्रल्हाद कक्कर आवडतात. त्यांनी दिग्दर्शक नाही तर स्टँड अप कॉमेडियन व्हायला हवं होतं. मग कदाचित त्यांच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं असतं. तुमच्या माहितीसाठी माझ्या नावाची नोंद गिनीज बूकमध्ये आहे आणि मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे आशा करतो तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाला हे बोलण्याची संधी द्याल.”