‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजेच ‘केबीसी’ या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाने लोकांचे मनोरंजन करत त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडली आहे. नव्या पर्वानुसार या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे. या पर्वामध्येही अमिताभ बच्चन सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत. निर्मात्यांनी या कार्यक्रमाच्या पुढील भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रोमो व्हिडीओमधून अमिताभ यांना भेट देण्यासाठी खास पाहुण्यांनी केबीसीमध्ये उपस्थित राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन आलेल्या स्पर्धकांसह गप्पा मारत खेळाची तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान खेळ थांबवा हे सांगणाऱ्या अलार्मचा आवाज येतो. आज अलार्मचा आवाज लवकर कसा वाजला या विचारात ते काही सेकंद स्तब्ध उभे राहतात. त्यानंतर सेटच्या एन्ट्रीगेटवरुन एक आवाज येतो. येणारी व्यक्ती ‘कभी कभी मेरे दिल में ये खयाल आता है’ हे गाणं गात असते. ऐकू आलेला आवाज अभिषेकचा आहे हे ते लगेच ओळखतात. पुढे अभिषेक बच्चन त्यांच्याजवळ जात त्यांना घट्ट मिठी मारतो. मुलाला मिठी मारताच अमिताभ यांच्या डोळ्यात पाणी येते.

आणखी वाचा – “दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर…” तेजस्विनी पंडितच्या नव्या वेबसीरिजची पहिली झलक समोर

‘केबीसीच्या मंचावरचे काही मौल्यवान क्षण. जे सर्वांचे अश्रू पुसतात, त्यांच्याच (अमिताभ बच्चन) डोळ्यात अश्रू तरळले’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन ८० वर्षांचे होणार आहेत. खास या निमित्ताने अभिषेक आणि जया बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर जाऊन त्यांना सरप्राइज गिफ्ट दिले. बच्चन कुटुंबियांची उपस्थिती असलेला हा विशेष भाग अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित केला जाणार आहे.

आणखी वाचा – “यंदा तुमचा दसरा कुठं..?” ठाण्याच्या नाट्यगृहातील प्रयोगानंतर संकर्षण कऱ्हाडेचा चाहत्यांना प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि पीव्हीआर सिनेमा यांनी मिळून ‘बच्चन बॅक टू बिगिनिंग’ (Bachchan back to beginning) या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत भारतातल्या १७ शहरांमध्ये अमिताभ यांचे ११ सुपरहिट चित्रपट दाखवले जाणार आहेत.