Pakistani Actor Fawad Khan Film Abir Gulaal : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला खूप विरोध होत आहे. सोशल मीडियावर लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता सरकारने या चित्रपटाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही.

फवाद खान व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांच्या चित्रपटाचं नाव ‘अबीर गुलाल’ आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, मात्र आता तसं होणार नाही. हा चित्रपट ९ मे रोजी रिलीज होणार आहे.

‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होणार नाही

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. अनेक चित्रपटगृहे फवादचा हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नव्हती आणि अनेक मनोरंजन संस्थांनी त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. आता मंत्रालयानेही त्याच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यास नकार दिला आहे.

फवाद खानची पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट

फवाद खानने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. “पहलगाममधील भीषण हल्ल्याच्या बातमीने दुःख झालंय. आमच्या संवेदना आणि प्रार्थना या भीषण घटनेतील पीडितांच्या पाठीशी आहेत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासाठी हिंमत मिळावी, त्यांना सावरायचं बळ मिळो यासाठी आम्ही प्रार्थना करतो,” असं फवाद खानने लिहिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला मनसेने विरोध केला होता. “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,” असं अमेय खोपकर म्हणाले होते.