अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तुफान गाजला. त्यापाठोपाठ या चित्रपटाचा पुढील भाग कधी प्रदर्शित होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाबद्दलचे सगळे अपडेट्स या चित्रपटाची टीम चाहत्यांना देत आहे. आता या चित्रपटात एका आघाडीच्या बॉलिवूड कलाकाराची एंट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : राखी सावंतला बनायचे आहे मुख्यमंत्री, पद मिळाल्यावर सर्वात आधी करणार ‘हे’ काम

अल्लू अर्जुनच्या डॅशिंग स्टाईलने ‘पुष्पा’चा शेवट करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या पूढील भागात पोलिस आणि पुष्पा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच असे म्हटले जात आहे की ‘पुष्पा २’ला बॉलिवूड टच देण्यासाठी निर्माते अर्जुन कपूरला चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात अर्जुन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

निर्मात्यांना ‘पुष्पा २’ हा ‘पुष्पा: द राइज’ पेक्षा खूप मोठा बनवायचा आहे आणि बॉलिवूड प्रेक्षकांना या चित्रपटात गुंतवून ठेवायचे आहे म्हणून ते अर्जुनचा विचार करत आहेत. परंतु अर्जुनच्या पात्राची छटा नकारात्मक असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. या चित्रपटात अर्जुन कपूर दिसला तर हा त्याचा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल.

दरम्यान, अर्जुनचे बॉलिवूड चित्रपट फारशी विशेष कामगिरी करू शकलेले नाहीत. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस पडला नाही. अशा परिस्थितीत अर्जुनने ‘पुष्पा’मध्ये काम केले तर ते त्याच्या करिअरच्या फायद्याचे असेल असे म्हटले जाते. अद्याप अर्जुनकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री साई पल्लवी ‘पुष्पा: द रुल’चा भाग बनणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र ‘पुष्पा’चे निर्माते रविशंकर यांनी एका मुलाखतीत या बातम्या खोट्या असल्याचे सांगत साई पल्लवी या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : रश्मिका मंदानाने केली फॅनची ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडिओ झाला व्हायरल

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसले. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. हा चित्रपट मूळतः तेलुगुमध्ये शूट करण्यात आला होता आणि नंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करण्यात आला होता. ‘पुष्पा’ ने जगभरात ३५० कोटींहून अधिक कलेक्शन केले. त्यापाठोपाठ ‘पुष्पा २’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.