Actor Mukul Dev Dies at 54: अभिनेते मुकुल देव यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुकुल देव यांनी आतापर्यंत चित्रपटांसह मालिकांमध्येदेखील काम केले आहे. बॉलीवूडसह त्यांनी दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विंदू दारा सिंह, मनोज बाजपेयी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनोज बाजपेयी यांनी लिहिले, “माझ्या भावना शब्दांत मांडणं कठीण आहे. मुकुल हा भावासारखा होता. तू खूप लवकर तरुण वयात गेलास. या दु:खातून सावरण्यासाठी त्याच्या कुटुंबाला शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मी करतो. मला तुझी आठवण येईल. ओम शांती.”
विंदू दारा सिंह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेते म्हणाले, “मुकुलच्या आई-वडिलांच्या निधनानंतर तो स्वत:बरोबरच जास्त वेळ घालवत होता. तो क्वचितच घराबाहेर जात असे किंवा कोणाला भेटत असे. काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती. तो रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या भावाप्रति आणि त्याला ओळखणाऱ्यांच्या प्रति माझ्या संवेदना आहेत. तो खूप चांगला होता. आपल्या सगळ्यांना त्याची आठवण येईल.”
अभिनेत्री दीपशिखा नागपालने मुकुल देव यांच्या निधनानंतर धक्का बसल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सोशल मीडियावर मुकुल देव यांच्याबरोबरचा फोटो शेअर करीत मला यावर विश्वास बसत नसल्याचे वक्तव्य केले आहे.
मुकुल देव यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच त्याच वर्षी त्यांनी सुश्मिता सेनबरोबर ‘दस्तक’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मुकुल देव यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते ‘कशिश’, ‘फिर कोई है’, ‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’, अशा गाजलेल्या मालिकांत मुकुल देव महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. ‘आर… राजकुमार’, ‘जल’, ‘हिम्मतवाला’, ‘दस्तक’, अशा चित्रपटांत त्यांनी काम केले होते.