Actor Ravi kishan Talks About His Father : रवी किशन यांना अभिनयाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी त्यांच्या मेहनतीने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलीवूड तसेच भोजपुरी सिनेमात काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु, हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांना यासाठी त्यांच्या वडिलांनी खूप विरोध केला होता. याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणारे अभिनेते म्हणजे रवी किशन. रवी किशन यांनी अभिनय क्षेत्रासाठी त्यांच्या वडिलांचा विरोध असल्याचं सांगितलं आहे. रवी किशन यांनी राज शमानीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “माझ्या वडिलांना नेहमी मी काही कामाचा नाहीये असं वाटायचं, त्यामुळे मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं की मी असा नाहीये. ते खूप बद्धिमान होते. ते एक पुजारी होते.”
रवी किशन पुढे वडिलांबद्दल म्हणाले, “मी एके दिवशी त्यांना ते एवढी पूजा का कारतात कारण एवढं करुनही आजही तुम्ही फाटलेलं धोतर नेसता, तुमची सायकल पण खूप जुनी झालेली आहे, असं म्हटलं होतं. माझ्या या बोलण्यामुळे ते रागावले आणि त्यांनी मला खूप मारलं. माझे वडील कधीच माझे लाड करायचे नाही. नेहमी मला मारायचे, त्यामुळे मला असं वाटायचं की त्यातच त्यांचं प्रेम दडलेलं आहे”.
रवी किशन यांनी पुढे अभिनयक्षेत्राबाबत त्यांचे वडील काय म्हणालेले याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “त्यांच्यासाठी समाजातील त्यांची ओळख फार महत्त्वाची होती आणि ते अभिनयाच्या विरोधात होते. मी गावी नाटकांमध्ये सहभाग घेत असे. तेव्हा मी अनेकदा माझ्या आईची साडी नेसून सीतेची भूमिका साकारायचो. परंतु, मला साडीत पाहून त्यांना धक्का बसायचा. त्यांना खूप राग यायचा. ते मला मारायचे. ते म्हणायचे, तू वेडा आहेस का? तुला नाचा व्हायचं आहे का? त्यांना मी शेती करावी असं वाटत होतं”.
रवी किशन पुढे मुलाखतीमध्ये त्यांच्या आईबद्दल म्हणाले, “एक दिवस माझ्या वडिलांनी मला खूप मारलं होतं, ते पाहून माझी आई घाबरलेली. म्हणून तिने मला घरातून पळून जाण्याला सांगितलं. त्यावेळी तिने मला ५०० रुपये दिले होते. आई म्हणालेली, जा इथून नाही तर तुझे बाबा तुला मारतील”.
रवी किशन यांनी पुढे त्यांची परिस्थिती बदलल्यानंतर त्यांच्या वडिलांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा मी पैसे कमवायला लागलो आणि माझी प्रगती झाली ते पाहून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. एक दिवस त्यांनी माझी माफीसुद्धा मागितली होती. ते म्हणाले की, मी तुला चुकीचं समजत होतो. परंतु, त्यांना असं बोलताना पाहून मी म्हणालो, तुम्ही माझ्यासाठी देवासमान आहात, तुम्ही मला खूप काही शिकवलं आहे”.
रवी किशन वडिलांबद्दल पुढे म्हणाले, “त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मी त्यांच्याबरोबर होतो. जेव्हा मला समजलं की त्यांच्याकडे फार वेळ नाही उरला आहे, तेव्हा मी त्यांना खासगी बोटीने बनारसला घेऊन गेलो. तिथेच त्यांचं निधन झालं. परंतु, मी कधीच रडलो नाही. मला त्यांची प्रत्येक छोटी गोष्ट अजूनही आठवते. पण, माहीत नाही माझ्यातल्या या भावना कधी बाहेर येतील”.