Actor Satish Shah Passes Away At 74 : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं २५ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता निधन झालं आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. CINTAA चे अधिकारी अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर ही दु:खद बातमी शेअर केली आहे. सतीश यांचं किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाल्याची माहिती अशोक पंडित यांनी दिली आहे.
“मी तुम्हा सर्वांबरोबर एक अतिशय दु:खद बातमी शेअर करतोय. आमचे प्रिय मित्र, प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं किडनी निकामी झाल्यामुळे निधन झालं आहे. राहत्या घरी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २५ ऑक्टोबरला दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल. मी सतीशबरोबर बरंच काम केलेलं आहे. तो अतिशय चांगला माणूस होता. आम्हा सर्वांसाठी ही अतिशय दु:खद बातमी आहे.” असं अशोक पंडित यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने सर्वांची मनं जिंकली आहेत. ‘जाने भी दो यारों’पासून, ‘कभी हां कभी ना’, ‘डीडीएलजे’, ‘कल हो ना हो’, ‘हम आपके है कौन’ ते अगदी ‘मैं हूं ना’पर्यंत अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. सतीश शाह यांनी चित्रपटाबरोबरच टेलिव्हिजन क्षेत्रातही मोठं योगदान दिलं आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेमुळे त्यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली.
सतीश शाह यांच्याबद्दल….
सतीश रविलाल शाह यांचा जन्म गुजरातमधील मांडवी येथे झाला होता. ते झेवियर्स कॉलेजचे पदवीधर होते आणि त्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतलं. सतीश शाह यांनी जवळपास २५० हून अधिक चित्रपट आणि असंख्य टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेलं आहे. २००८ मध्ये त्यांनी कॉमेडी सर्कस या शोचे सह-परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि २०१५ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य म्हणून काम केलं होतं.
