actor Vijay Raaz acquitted in sexual harassment case : अभिनेते विजय राज यांची लैंगिक छळाच्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विजय राज ‘स्त्री’, ‘डेल्ही बेली’, ‘डेढ इश्किया’, ‘गली बॉय’ यांसारख्या चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या सेटवर एका सहकाऱ्याने विजय राज यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, या आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गोंदिया मॅजिस्ट्रेट कोर्टाने विजय राज यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले आहेत. विजय यांच्या वकील सवीना बेदी सच्चर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरजवळ ‘शेरनी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. पण या आरोपांमुळे विजय राज यांना चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडावे लागले, इतकंच नाही तर नंतर कामही गेलं. पण आता ते निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. आरोप लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला दोषी ठरवणाऱ्या लोकांसाठी हे एक उदाहरण ठरेल, अशी आशा आहे, असं सवीना म्हणाल्या. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
२०२० मध्ये घडली होती घटना
ही घटना ४ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती. मध्य प्रदेशातील बालाघाट येथे चित्रपटातील क्रू मेंबर्स एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे एका क्रू मेंबरचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून विजय राज यांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
नोव्हेंबर २०२० मध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असं म्हटलं होतं की, विजय राजने तिच्या दिसण्याबद्दल टिप्पणी केली होती. तसेच तिच्या संमतीशिवाय तिचा मास्क बदलण्याचा प्रयत्न केला. महिलेने सुरुवातीला आक्षेप घेत वरिष्ठांना या घटनेबद्दल सांगितलं. नंतर तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता जवळपास साडेचार वर्षांनंतर या प्रकरणी गोंदिया कोर्टाने निर्णय दिला असून विजय राज यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
‘शेरनी’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर विजय राज यांनी ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘चंदू चॅम्पियन’, ‘भूल भुलैया ३’ मध्ये काम केलं. ते नुकत्याच आलेल्या ‘फतेह’मध्ये झळकले होते. या चित्रपटात सोनू सूदची मुख्य भूमिका होती. दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं.