सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता यावर अभिनेत्री अदा शर्मा हिने मौन सोडले आहे.

चित्रपटाची कथा काही महिलांची आहे, ज्यांना मुस्लीम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते. केरळमधील तब्बल ३२००० महिलांनी कथितपणे इस्लाम धर्म स्वीकारला असून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. पण हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चुकीचा प्रोपगंडा पसरवण्याचे काम करण्यात येत आहे, असे म्हणत अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला. आता यावर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा हिने भाष्य करीत टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अदाने ‘द केरळ स्टोरी’बद्दलचा एक व्हिडीओ नुकताच तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा चित्रपट दहशतवादविरोधी संघटनेवर नक्कीच भाष्य करीत आहे. मुलींवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन, मुलींचा करण्यात येणारा ब्रेनवॉश, त्यांच्यावर केला जाणारा बलात्कार, मानवी तस्करी आणि जबरदस्तीने गर्भधारणा करणे आणि त्यानंतर वारंवार बलात्कार करणे याविरोधात आहे. मुली ज्या बाळांना जन्म देतात ती त्यांच्यापासून दूर केली जातात आणि नंतर त्यांना आत्मघाती बॉम्बर बनवले जाते. अशा अनेक गंभीर समस्यांवर हा चित्रपट भाष्य करीत आहे.”

हेही वाचा : Photos: बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री रस्त्यावर विकतेय भाजी? नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर याबरोबरच त्यांनी ‘एएनआय’शी संवाद साधला. यावेळी अदा म्हणाली, “एक माणूस विशेषत: एक मुलगी या नात्याने मला ही गोष्ट खूप भीतीदायक आणि धक्कादायक वाटते की मुली गायब होत आहेत. याहून भीतीदायक गोष्ट म्हणजे काही याला अपप्रचार म्हणत आहेत किंवा गायब झालेल्या मुलींच्या संख्येच्या आकडेवारीची चर्चा करीत आहेत. मला विश्वास बसत नाही की मुली गायब होण्याच्या मुद्द्याच्या आधी लोक त्या संख्येबद्दल बोलत आहेत. खरे तर हे उलट असायला हवे. आधी मुली गायब होत आहेत याबद्दल चर्चा व्हायला हवी आणि नंतर त्या संख्येबद्दल बोलायला हवे.” ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.