अभिनेत्री शांती प्रियाला अक्षय कुमारबरोबर ‘सौगंध’ चित्रपट केल्यावर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने मेरे सजना साथ निभाना, फूल और अंगार असे काही चित्रपट केले. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
शांती प्रियाने १९९२ मध्ये अभिनेता सिद्धार्थ रे याच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी होती, त्यामुळे लग्नानंतर तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. स्क्रीनशी बोलताना शांती प्रियाने तिच्या व सिद्धार्थच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. “एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं आणि मला फार खास वाटलं. तो चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कुटुंबातून आला होता, पण त्याच्यात तो अॅटिट्यूड नव्हता. तो खूप साधे कपडे घालायचा. नंतर आमची ओळख झाली आणि पहिल्या भेटीनंतर वर्ष व्हायच्या आत आम्ही लग्न केलं,” असं शांती प्रिया म्हणाली.
लग्नानंतर इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण शांती प्रियाने सांगितलं. “माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला वैवाहिक जीवन एन्जॉय करायचं होतं. मुंबई माझ्यासाठी पूर्णपणे नवीन ठिकाण होतं. मी दक्षिण भारतीय होते. तो महाराष्ट्रीय व बंगाली होता. त्यामुळे मला त्याची संस्कृती शिकायची होती, सगळं समजून घेऊन संसार करायचा होता. मला त्याने इंडस्ट्री सोडायला सांगितलं नव्हतं,” असं शांती प्रियाने नमूद केलं.
त्याला अचानक उचकी आली अन्…
शांती प्रिया व सिद्धार्थ यांचं लग्न झालं, त्यांना दोन मुलं झाली. पण २००४ मध्ये सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तो दिवस आठवत शांती प्रिया म्हणाली, “ते खूप धक्कादायक होतं. संध्याकाळची वेळ होती… जेवणाची वेळ होती. तो माझ्या धाकट्या मुलाला काहीतरी शिकवत होता. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. मी, तो आणि आमची दोन्ही मुलं. त्याला अचानक उचकी आली आणि त्याने डोकं खाली टेकवलं.”
मला काहीच सुचत नव्हतं – शांती प्रिया
“तो अगदी सहज, कोणत्याही त्रासाशिवाय गेला, पण मी ते कधीच विसरू शकत नाही. त्याला तसं पाहून मला काहीच सुचत नव्हतं, मी काहीच करू शकत नव्हते. माझी मदतनीस आली, तिने त्याला जिवंत करण्यासाठी काही प्रयत्न केले. आमच्याकडे वरच्या मजल्यावर एक डॉक्टर राहत होते, आम्ही त्यांना बोलावलं. कसं तरी, आम्ही त्याला सोफ्यावर नेलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, इंजेक्शन दिले, पण काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मी स्तब्ध झाले होते, कसं व्यक्त व्हावं ते मला कळत नव्हतं. भावना व्यक्त कराव्यात की जबाबदारी घ्यावी हे मला समजत नव्हतं,” असं शांती प्रिया म्हणाली.
कोणाचीही मदत नको होती
शांती प्रिया त्या घटनेनंतर बदलली. “मी अचानक लोकांपासून दूर होऊ लागले. मी रडले नाही. मला हतबल दिसायचं नव्हतं. मला कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. सर्व विधी संपल्यानंतर, मला अचानक जाणवलं की ‘तो आता आमच्याबरोबर नाही.’ माझ्या आईने मला विचारलं की मी तिच्याबरोबर परत जाणार का, मी नकार दिला. मी आतून हादरले होते, तरी इतरांना ते जाणवू दिलं नाही,” असं शांती प्रिया म्हणाली.
पतीच्या जाण्याचा धक्का बसल्याने शांती प्रियाच्या आयुष्यात खूप बदल झाला. ती मानसिकदृष्ट्या संघर्ष करत होती. “माझ्या आयुष्यात रंग उरले नव्हते. मी फक्त पांढरे कपडे घालत होते. माझ्या डोक्यात काही गोष्टी चालू होत्या. एके दिवशी, जेव्हा माझी आई माझ्याकडे आली, तेव्हा मला असं पाहून तिला धक्का बसला. जिवंत मृतांसारखं वागत असल्याने ती माझ्यावर ओरडली. ती म्हणाली, ‘तुझी मुलं हे डिझर्व्ह करतात, असं तुला वाटतं का? त्यांच्यासाठी फक्त तूच आहेस. मी अशिक्षित आणि एकल माता होते, तरीही तुम्हा सर्वांना चांगलं आयुष्य दिलं. त्या तुलनेत तुझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तू शिकलेली आहेस.’ आई बोलल्यानंतर मी भानावर आले, मी स्वतःला सावरलं आणि माझ्या मुलांसाठी जगायचं ठरवलं,” असं ती म्हणाली.