Umrao Jaan Movie : लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचा ‘उमराव जान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाली. परंतु, अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. मुझफ्फर अली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटाची कथा, गाणी आणि रेखाचं सादरीकरण या सगळ्यामुळे या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाद्वारे रेखाच्या पात्राला प्रेक्षकपसंती मिळाली होती. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
‘उमराव जान’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाल्यानिमित्ताने चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी चित्रपटातील काही किस्से सांगितले. या मुलाखतीदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफ्फर अली यांनी, ‘उमराव जान’ हा चित्रपट रेखाची पहिली पसंती नव्हता, असा खुलासा केला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक पुढे म्हणाले, “शेवटी रेखानंच ही भूमिका साकारली आणि तिनं भूमिकेच्या सादरीकरणाद्वारे संधीचं सोनं केलं. मी जेव्हा या भूमिकेबद्दल आणि सलमा सिद्दिकी यांच्या आवाजात चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे रेखा आली. ती तिच्या डोळ्यांतून ही कथा कशी सांगेल हा विचार मी केला आणि शेवटी तिनं अपेक्षित काम करीत तिच्या उत्तम सादरीकरणातून सगळ्यांचीच मनं जिंकली. मला असं नाही वाटत की, दुसरं कोणीही हे करू शकलं असतं”.

मुझफ्फर अली यांनी आजवर ‘उमराव जान’, ‘जानिसार’, ‘अंजुमन’, ‘आगमान’, ‘गमन’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं आहे. व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत आशयघन चित्रपटांकडे त्यांचा अधिक कल होता. मुझफ्फर अली यांच्या ‘उमराव जान’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाली त्यानिमित्ताने चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुझफ्फर अली मुलाखतीदरम्यान म्हणाले, “या चित्रपटासाठी सुरुवातीला मी अभिनेत्री स्मिता पाटीलचा विचार केला होता. तिनं माझ्याबरोबर ‘गमन’ या चित्रपटात काम केलं होतं आणि तिनं या चित्रपटातसुद्धा उत्तम काम केलं असतं”. दिग्दर्शक याबाबत सांगताना पुढे म्हणाले, “पण आम्हाला नंतर असं वाटलं की, चित्रपटासाठी अजून कोणीतरी वेगळी अभिनेत्री हवी, जिचे चेहऱ्यावरील हावभाव अजून खुलून येतील”.