Metro In Dino Box Office Collection Day 5 : अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट ४ जुलैला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. आज (९ जुलै) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, अनुपम खैर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकत आहेत. एकूणच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटाचं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहे हे जाणून घेऊयात. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३.५ कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी ५ जुलैला या चित्रपटाने सहा कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी ‘मेट्रो इन दिनो’ने बॉक्स ऑफिसवर ७.२५ कोटींचा गल्ला जमावला.
आदित्य रॉय कपूरच्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी २.५ कोटी, तर पाचव्या दिवशी २.९ कोटींची कमाई केली. ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाचं आजचं सहाव्या दिवशीचं आतापर्यंतचं कलेक्शन हे ०.०४ कोटी इतकं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत या चित्रपटानं एकूण २२.१९ कोटींचा गल्ला जमावला आहे.
‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर हा चित्रपट ‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. २००७ साली ‘लाइफ इन मेट्रो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामध्ये दिवंगत अभिनेते इरफान खान व कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकांत झळकले होते. या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसवर एकूण १५.६३ कोटींची कमाई केली होती.
‘लाइफ इन मेट्रो’ चित्रपटाचं तेव्हा समीक्षकांकडून कौतुकही झालं होतं. अशातच आता काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘मेट्रो इन दिनो’ प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये सारा अली खान, आदित्य रॉय कपूर यांसारख्या कलाकारांची वर्णी लागली आहे. सारा व आदित्य या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.