बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट, अशी आमिर खान(Aamir Khan)ची ओळख आहे. आमिर खानने त्याच्या कारकि‍र्दीत अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. राजा हिंदुस्तानी, दिल यांसारख्या चित्रपटांचा आजही चाहतावर्ग आहे. तारे जमीन पर हा अनेक उत्तम चित्रपटांपैकी मानला जातो. तसेच दंगल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वोच्च कमाई करीत विक्रम रचला होता. लवकरच अभिनेता सितारे जमीन पर या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्यात अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आला आहे. आता आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव यांनी त्यांचा पूर्वाश्रमीचा पती आमिर खानच्या घरी ईद हा सण साजरा केला. किरण रावने सोशल मीडियावर त्याबाबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

किरण राव व रीना दत्त यांनी आमिर खानच्या कुटुंबाबरोबर साजरा केला ईद सण

भारतीय चित्रपट निर्माती किरण रावने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. किरण रावने ईद हा सण तिचा पूर्वाश्रमीचा पती आमिर खानच्या घरी साजरा केला. काही फोटोंमध्ये किरण राव आणि रीना दत्ता एकत्र दिसत आहेत. मात्र, आमिर खान या फोटोंमध्ये दिसत नाही. किरण रावने आमिरच्या बहि‍णींबरोबरदेखील फोटो काढले आहेत. एका फोटोमध्ये ती आमिर खानच्या आईबरोबर दिसत आहे. त्याबरोबरच किरण रावने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमिर व तिचा मुलगा आझाद, रीना दत्ता व आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा नवरा नुपूर शिखरे, नपूरची आई, तसेच आशुतोष गोवारीकर, असे अनेक पाहुणे या सणासाठी एकत्र आल्याचे दिसत आहे. रीना दत्ता व किरण राव एकत्र दिसतात. इरा खानच्या लग्नातही किरण रावने हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आमिरबरोबर घटस्फोट झाल्यानंतरही या संपूर्ण कुटुंबाचे प्रेमळ नाते दिसते. अनेक प्रसंगांना ते एकत्र दिसतात.

आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या ६० व्या वाढदिवसाला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तो गौरी स्प्रॅटबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने म्हटले होते. अभिनेत्याने तो दीड वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. गौरी स्प्रॅट आणि आमिर खानची २५ वर्षांपासून ओळख आहे. बंगळुरूच्या गौरीची व आमिरची दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा भेट झाली आणि ते प्रेमात पडले. गौरीने आमिरचे फक्त दोनच चित्रपट पाहिले आहेत. तिने तारे जमीन पर हा चित्रपट पाहावा, अशी इच्छाही आमिरने व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खानची याआधी दोन लग्ने झाली आहेत. आमिर खान व किरण राव यांनी २००५ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र त्यांनी २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगादेखील आहे आणि त्याचे नाव आझाद, असे आहे. किरण रावबरोबर आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. याआधी त्याने रीना दत्ताबरोबर लग्न केले होते. १९८६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती; मात्र २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना इरा खान व जुनैद खान, अशी दोन मुले आहेत. जुनैद खान सध्या बॉलीवूडमध्ये काम करीत आहे. आमिरचा बहुप्रतीक्षित ‘सितारे जमीन पर’ चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.