मराठमोळे मिलिंद गुणाजी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं. खलनायक व सहाय्यक भूमिका त्यांनी साकारल्या. आपल्या अप्रतिम अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करणारे मिलिंद यांना बिग बींच्या ‘मृत्यूदाता’ चित्रपटात खलनायकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण ते हा चित्रपट करू शकले नव्हते. ही ऑफर नाकारल्यानंतर घाबरल्यामुळे आपण अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती, असा खुलासा मिलिंद यांनी केला आहे.
‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या मुलाखतीत मिलिंद यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी कशी हुकली, याबाबत सांगितलं. “अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूदातामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका मी करणार होतो. पण तारखांची अडचण होती. मी विरासत की दुसऱ्या एखाद्या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. मी तेच कारण मृत्यूदाताचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांना सांगितलं होतं. मी म्हणालो, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची ही खूप मोठी संधी आहे, पण मला चित्रपट करायला जमणार नाही. त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की ‘नवख्या मिलिंद गुणाजीने अमिताभ बच्चनसह काम करण्यास नकार दिला’. मुळात तारखा जुळत नसल्याने मी तो चित्रपट करू शकलो नव्हतो. पण यानंतर मी घाबरलो आणि माझ्या सेक्रेटरीला बिग बींबरोबर मीटिंग ठेवायला सांगितलं. कारण मला त्यांना नाराज करायचं नव्हतं,” असं मिलिंद गुणाजी म्हणाले.
“बिग बी मेहबूब स्टुडिओमध्ये एका गाण्याचं शूटिंग करत होते. मी बाहेर माझी गाडी पार्क केली आणि त्यांच्या व्हॅनबाहेर ते येण्याची वाट पाहत थांबलो. त्यांनी आल्यावर ‘काय झालं?’ असं विचारलं. मी त्यांना माझ्या बाजूने स्पष्टीकरण दिलं आणि चित्रपट करण्यास नकार दिला नसल्याचं सांगितलं. फक्त तारखांची अडचण आहे, असं म्हणालो. ते ऐकून बिग बी हसू लागले आणि म्हणाले, ‘तू त्याची काळजी करू नकोस. या गोष्टींकडे फार लक्ष देऊ नकोस. तू चांगलं काम करतोय, ते करत राहा,’ असं बोलून त्यांनी तो विषय संपवला,” असं मिलिंद गुणाजी म्हणाले.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास मिलिंद गुणाजी शेवटचे ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसले होते. त्याव्यतिरिक्त ते ‘हिट: द फर्स्ट केस’मध्ये झळकले. त्यांनी अजय देवगणच्या ओटीटी सीरिज ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’मध्येही काम केलं होतं.