Mohit Suri Talk’s About Ahaan Panday and Aneet Padda : मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपट काल १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतं. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. याचं एक कारण म्हणजे चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले दोन नवीन चेहरे. या चित्रपटातून अहान पांडे व अनित पड्डानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

अहान पांडे व अनित पड्डा त्यांच्या पदार्पणातील चित्रपटामुळे चर्चेत आहेत. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे साधारणत: चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामधील कलाकार मंडळी त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतात. परंतु, यावेळी चित्रपटातील नायक-नायिका चित्रपटाचं कुठेही प्रमोशन करताना दिसले नाहीत. तरीसुद्धा त्यांच्या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘सैयारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला. मोहित यांनी ‘जस्ट टू फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अहान पांडे व अनित पड्डा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग नसल्यामागचं कारण सांगितलं आहे. मोहित सुरी म्हणाले, “हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असून चित्रपटाचे निर्माते व आदित्य चोप्रा यांनी सल्ला दिला होता की, अहान व अनित यांच्याकडे बोलण्यासाठी जोवर काही नसेल तोपर्यंत त्यांना मुलाखतींमध्ये चित्रपटाच्या सेटवर मस्तीखोर कोण होतं, मोहित सुरींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? असेच प्रश्न विचारले जातील”.

मोहित सुरी पुढे म्हणाले, “या सर्व निरर्थक गोष्टी आहेत आणि मला वाटत नाही की, कोणालाही हे ऐकण्यात काही रस असेल”. दिग्दर्शक पुढे म्हणाले, “अहान व अनित यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधून वगळण्यामागे आमची स्ट्रॅटेजी होती. आम्ही ठरवून ते केलं आहे”. त्यासह त्यांनी त्यांच्या एका चित्रपटातील किस्सासुद्धा सांगितला आहे, ज्यामधून त्यांनी अशाच दोन नवीन चेहऱ्यांना लाँच केलं होतं.

मोहित सुरी यांच्या ‘आशिकी २’ चित्रपटातून अभिनेत्री श्रद्धा कपूर व आदित्य रॉय कपूर यांनी पदार्पण केलं होतं. त्यावेळीसुद्धा आदित्य व श्रद्धा यांना प्रमोशनपासून जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आलेलं. मोहित सुरी याबाबत म्हणाले, “मला आठवतं जेव्हा मी ‘आशिकी २’ करीत होतो तेव्हा आम्ही गोवा येथे चित्रपटाचं चित्रीकरण करीत होतो. त्यावेळी लोक मला ओळखत होते; पण आदित्य व श्रद्धा त्यांच्यासाठी नवीन होते”.

दिग्दर्शक पुढे म्हणाले, “नंतर जेव्हा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी आम्ही विमानानं प्रवास करीत होतो तेव्हा चित्रपटाचा पहिला शो सुरू झाला होता. त्यावेळी विमानातून उतरल्यानंतर मी पाहिलं की, श्रद्धा व आदित्यला बघितल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोकांनी विमानतळावर गर्दी केली होती. त्यावेळी त्यांना जे प्रेम मिळालं, ते त्यांच्या दिसण्यामुळे नाही किंवा आमच्यामुळेसुद्धा नाही. तर लोक त्यांच्याशी त्यांच्या चित्रपटातील कामामुळे जोडले गेले होते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आशिकी २’च्या वेळी आदित्य व श्रद्धा नवीन असताना त्यांना प्रमोशनपासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटेजी उपयोगी आली होती. त्यामुळे आतासुद्धा सैयारा’ची प्रेक्षकांमधील केझ बघता, यावेळीसुद्धा चित्रपटाला या स्ट्रॅटेजीचा फायदा होण्याची शक्यता आहे.