Aishwarya Rai And Aaradhya Video: नुकताच ७८ वे कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडले. या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय, आलिया भट्टसह अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
ऐश्वर्या राय व आलिया भट्ट यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. आता या सगळ्यात ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या रायबरोबर तिच्या लेकीनेदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मायलेकींनी वेधले लक्ष
रेड कार्पेटवर हजर राहण्यापूर्वी ऐश्वर्या व आराध्याचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ऐश्वर्या तिच्या डिझाइन टीमबरोबर आहे. तिथे आराध्यादेखील दिसत आहे. ऐश्वर्या राय अत्यंत सुंदर दिसत आहे. ऐश्वर्याच्या डिझायनर गौरव गुप्ताने सोशल मीडियावर ऐश्वर्याचे कौतुक करीत लिहिले की, ऐश्वर्या राय खरंच खूप सुंदर आहे. ‘कान्स’ची क्वीन आहे, असे लिहीत गौरव गुप्ताने ऐश्वर्याचे कौतुक केले आहे.
आराध्या ही ऐश्वर्या व अभिषेक बच्चनची मुलगी आहे. आराध्या व ऐश्वर्या राय यांच्या बॉण्डिंगची कायमच चर्चा होताना दिसते. आराध्या अनेक ठिकाणी ऐश्वर्याबरोबर कार्यक्रमांना उपस्थित असते. ऐश्वर्यादेखील तिच्या लेकीला प्रत्येक ठिकाणी घेऊन जाते. त्यामुळे मायलेकीच्या नात्याचे कौतुकही होताना दिसते. कान्स फिल्म फेस्टिव्हलआधी ऐश्वर्याने फर्स्टपोस्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत ऐश्वर्याने खुलासा केला की, आराध्याला ती प्रत्येक ठिकाणी का घेऊन जाते.
ऐश्वर्या राय म्हणालेली, “आराध्या सगळीकडे माझ्याबरोबर असते की, कारण माझ्या मल्टिटास्किंग आयुष्याचा ती भाग आहे. मी सगळ्या गोष्टी तिच्यापुढे शक्य तितक्या खऱ्या ठेवते. इतर कोणत्याही सामान्य मुलीप्रमाणे ती सध्या शाळेत शिक्षण घेत आहे. पण, जेव्हा ती लहान होती. तिथल्या लहान मुलांबरोबर तिने खेळावे यासाठी मी तिला प्ले-पार्कमध्ये घेऊन जायचे. मुंबईत या सगळ्या गोष्टी करणे अवघड होते. मात्र, जेव्हा मी इतर ठिकाणी जात असते. तेव्हा मी तिला तिथल्या पार्कमध्ये घेऊन जात असते. तिथेसुद्धा आम्हाला ओळखणारे लोक भेटतात. पण, ते सामान्य पालक आणि लहान मुले असतात. आराध्याचे आयुष्य सामान्य आहे. मी तिला समजावून सांगितले आहे की, हे माझे आयुष्य आहे आणि ती माझ्या आयुष्याचा भाग आहे.
पुढे ऐश्वर्या राय म्हणाली, “आराध्या इतर सामान्य मुलांप्रमाणे आहे. हे सगळे सहज घडलेले नाही. त्यावर काम करावे लागले. मला आनंद आहे की, तिला वेळ देण्यासाठी मी कामातून ब्रेक घेतला. आता लोक जेव्हा आराध्याला भेटतात आणि म्हणतात की, ती इतर सामान्य मुलांप्रमाणे आहे. त्यावेळी मला वाटते की, आई म्हणून मला बक्षीस मिळाले आहे.”
दरम्यान, ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.