Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Relationship : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन हे मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं आहे. गेल्या वर्षी त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा चांगल्या रंगल्या होत्या. मात्र, दोघांनीही या चर्चांवर कधीच कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. याऐवजी ते दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आणि या अफवांना अप्रत्यक्षरित्या खोडून काढत राहिले.
अशातच एका मुलाखतीत फिल्ममेकर आणि ऐश्वर्याचे शेजारी प्रल्हाद कक्कर यांनी ऐश्वर्या-अभिषेक याच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, या सगळ्या फक्त अफवा होत्या आणि ऐश्वर्या-अभिषेक एकत्रच राहतात. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रल्हाद कक्कर, हे ऐश्वर्या राय यांच्या आई राहतात, त्याच इमारतीत राहतात. त्यांनी सांगितले की, ऐश्वर्या आईकडे फक्त तिची काळजी घ्यायला येते. कारण तिच्या आईची तब्येत काही काळापासून खराब आहे.
त्यांनी सांगितले की, ऐश्वर्या रोज सकाळी तिच्या मुलीला (आराध्याला) शाळेत सोडते आणि शाळा सुटेपर्यंतच्या वेळात आईबरोबर वेळ घालवते. याबद्दल प्रल्हाद कक्कर म्हणाले, “ऐश्वर्या तिच्या आईची खूपच काळजी आहे.” ऐश्वर्याचे जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी पटत नसल्यामुळे ती आईकडे राहायला गेली का? असं जेव्हा त्यांना विचारण्यात आले. तेव्हा प्रल्हाद म्हणाले, “यात काहीच तथ्य नाही. ती त्या घराची सून आहे आणि अजूनही ते घर ती सांभाळते.”
ते पुढे म्हणाले, “लोक म्हणत होते की, ती आईकडे राहते. पण या सगळ्या चर्चा निरर्थक होत्या. पण ती राहायला जात नव्हती, फक्त काही वेळच तिकडे जात होती. मला माहिती आहे की, तिला तिच्या आईची किती काळजी आहे. कधी-कधी अभिषेकही तिच्याबरोबर तिथे यायचा. जर त्यांच्या नात्यात काही आलबेल नसतं, तर अभिषेक तिथे आला असता का? पाहा ना… दोघांच्या नात्याबद्दल ना अभिषेकने काही बोलला, ना ऐश्वर्या… त्यांनी काही उत्तर दिलंच नाही, कारण त्यांना गरज वाटली नाही. लोक काहीही बोलत राहतात.”
दरम्यान, २०२४ मध्ये, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा पुन्हा समोर आल्या, जेव्हा अंबानी कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या आल्या, तर अमिताभ, जया, अभिषेक, श्वेता, अगस्त्या आणि नव्या वेगळ्या दिसले. यावरून अनेकांनी तर्क लावायला सुरुवात केली की हे जोडपं वेगळं राहतं आहे.