Ajinkya Deo Talks About Ranbir Kapoor : अजिंक्य देव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. अजिंक्य येत्या काळात बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’मधून झळकणार आहेत. अशातच आता त्यांनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता रणबीर कपूरबद्दल सांगितलं आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासह बॉलीवूडमधील, दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव रणबीर कपूर साकारत असलेल्या प्रभू श्री रामांच्या गुरूंची विश्वमित्र यांची भूमिका साकारणार आहे.

अजिंक्य देव यांनी केलं रणबीर कपूरचं कौतुक

अजिंक्य देवने अशातच रणबीर कपूरबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्याचं कौतुक केलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार अजिंक्य देव रणबीरबद्दल म्हणाले, “आरकेने काम करताना खूप चांगली साथ दिली. शॉट झाल्यानंतर तो कौतुक करायचा, छान सीन झाला सर, तुमची फिटनेस छान आहे, तुमच्या वयाचा झाल्यानंतर मी इतका फिट असेन की नाही मला माहीत नाही, तुमचं वय इतकं आहे वगैरे वाटत नाही; वर्कआउट कुठे करता? मी म्हटलं धन्यवाद आरके. तो खूप प्रेमळ आणि खरा माणूस आहे.”

रणबीरबद्दल अजिंक्य पुढे म्हणाले, “तो जसा दिसतो तसाच आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा सेटवर तुमच्यामध्ये इतके चागंले संबंध असतात तेव्हा स्क्रीनवरही ते दिसून येतात. प्रेक्षकांबरोबर पटकन आपण कनेक्ट होतो. पूर्वी कलाकारांमध्ये अंतर असायचं, ऑनस्क्रीन वेगळं आणि ऑफस्क्रीन वेगळं, पण आता तसं नाहीये.”

दरम्यान, अजिंक्य देव सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या आयुष्यातील घडामोडी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.