प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री मोहिनी खूप सुंदर दिसायची. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं होतं. पण या सुंदर अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. मोहिनीने तब्बल सात वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.
आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका करणारी मोहिनी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. नैराश्यात असलेल्या मोहिनीने सात वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मोहिनीने सांगितलं की ती एकदा एका ज्योतिषाकडे गेली होती. ज्योतिषाने तिला म्हटलं की तिच्यावर जादुटोणा केला आहे. अभिनेत्रीला तिच्या पतीच्या नातेवाईकावर संशय होता. “लग्नानंतर मी पती व मुलांबरोबर चांगलं आयुष्य जगत होते, पण एक वेळ अशी आली की मी नैराश्यात आहे, असं मला वाटू लागलं. माझ्या आयुष्यात काहीच चुकीचं घडत नव्हतं, तरीही मी नैराश्यात जात होते. मी आत्महत्येचे प्रयत्न केले, एक नाही तर सात वेळा. या सर्व गोष्टीतून बाहेर येण्यासाठी मी एका ज्योतिषाची मदत घेतली,” असं मोहिनी म्हणाली.

पतीच्या चुलत बहिणीवर आरोप
ज्योतिषाने सांगितलेल्या जादुटोण्याच्या गोष्टीवर आधी मोहिनीने विश्वास ठेवला नाही. “आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं धाडस माझ्यात कुठून आलं, याचं मलाच आश्चर्य वाटलं. या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ लागल्यावर मी त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला,” असं मोहिनीने नमूद केलं. “माझी ही अवस्था माझ्या पतीच्या चुलत बहिणीमुळे झाली होती. तिने माझ्यावर जादुटोणा केला होता, पण प्रभू येशूंनी मला वाचवलं,” असं मोहिनी म्हणाली.
मोहिनीचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. पण २००६ मध्ये तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मोहिनीने अक्षय कुमारबरोबर १९९१ साली आलेल्या ‘डान्सर’ चित्रपटात काम केलं होतं. मोहिनीने हिंदीबरोबरच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९९९ साली तिने लग्न केलं आणि संसारात रमली.