Jolly LLB 3 Controversy : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचे दोन भाग याआधी प्रदर्शित झाले असून, आता ‘जॉली एलएलबी’चा तिसरा भाग येत्या १९ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

(सिनेमॅटिक लिबर्टीच्या) नावाखाली चित्रपटातील कलाकार आणि निर्माते यांनी चित्रपटात थेट वकील आणि न्यायाधीशांबद्दल विनोद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील नामांकित वकील ॲड्. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड्. गणेश म्हस्के यांनी दिवाणी न्यायाधीश, पुणे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केलं आहे. अशातच आता दिल्लीतील वकिलांनीही सिनेमाचा निषेध केला आहे.

दिल्लीचे प्रसिद्ध वकील ए. पी. सिंह यांनी ‘जॉली एलएलबी ३’ सिनेमाबद्दल त्यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक हाय-प्रोफाइल खटले लढवलेले दिल्लीचे वकील ए. पी. सिंह यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, हा चित्रपट वकिलांना जोकरसारखं दाखवण्यात आलं असून, न्यायसंस्थेचीही खिल्ली उडवली आहे.

ते म्हणाले, “आम्ही वकील आहोत; विनोदी कलाकार नाही. वकिली हे जगातलं सर्वांत पवित्र आणि गंभीर व्यावसायिक क्षेत्र आहे. पण, या चित्रपटात आमच्या व्यवसायाची थट्टा केली जात आहे. सिनेमाचं माध्यम खूप प्रभावी असतं. जर लोक वकिलांना जोकर समजू लागले, तर मग न्यायव्यवस्थेचा आदर कोण करणार?”

यानंतर त्यांनी असं म्हटलंय, “आम्ही या देशातील गरीब, दलित, पिडीत, कामगार आणि सर्वच धर्म, भाषा, क्षेत्र आणि सांप्रदायाच्या लोकांना न्याय मिळवून देतो. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक प्रयत्नांची परकाष्टा करतो. अनेकदा रात्रभर न्यायलये सुरू असतात, ते फक्त लोकांच्या न्यायासाठीच. पण या सिनेमातून चुकीचा संदेश दिला जात आहे.”

‘जॉली एलएलबी ३’ सिनेमाच्या वादाची सुरुवात पुण्यातून झाली. तिथे काही वकिलांनी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जनहित याचिका (PIL) दाखल केली. याचिकेत म्हटलं आहे की, ट्रेलरमधील काही दृश्यं वकिल आणि न्यायाधीश यांची प्रतिमा मलीन करतात. या याचिकेनंतर पुणे न्यायालयानं अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि दिग्दर्शक सुभाष कपूर यांना समन्स जारी केलं.

दरम्यान, ‘जॉली एलएलबी’ हा पहिला चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर २०१७ मध्ये ‘जॉली एलएलबी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या भागात अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने एण्ट्री घेतली. अशातच आता तिसऱ्या भागात अक्षय आणि अर्शद हे दोघं एकत्र आले आहेत.