Know Networth Of This Famous Bollywood Actor : अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर असं म्हटलं जातं की, तुमच्या ओळखी असणं, कोणी वाली असणं महत्त्वाचं असतं. परंतु, असं असलं तरी इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी स्वबळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातील एक नाव म्हणजे बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अभिनेता अक्षय कुमार.
अक्षय कुमारचं मूळ नाव राजीव भाटिया. त्याने आजवर अनेक चित्रपटांत काम करत त्याच्या डॅशिंग अंदाजाने अनेकांना त्याच्या प्रेमात पाडलं. त्याची स्टाईल, त्याची विनोदीशैली या सगळ्या गोष्टींमुळे तो कायम प्रेक्षकांची मनं जिंकत आला. आज अक्षय कुमारचा वाढदिवस. यंदा अभिनेता त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वेळोवेळी मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. अक्षय कायमच त्याच्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. त्याने सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांतही काम केलं, त्यामुळे आज तो बॉलीवूडमधील टॉपच्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. एवढंच काय तर अक्षय कुमार श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. अक्षयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरची सुरुवात कशी झाली, त्याची नेटवर्थ किती आहे? जाणून घेऊयात…
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वेटर म्हणून केलेलं काम
‘जनसत्ता’च्या वृत्तानसुार अक्षय कुमारने मुंबईतील माटुंगा येथील ‘डॉन बॉस्को हायस्कूल’मधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने कराटे शिकायला सुरुवात केली. अक्षयला अभ्यासात फार काही रस नव्हता. त्याला मार्शल आर्टस शिकण्याची इच्छा होती. तो थायलंडला जाऊन थाई बॉक्सिंग शिकला. अक्षय कुमार अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वेटर आणि शेफ म्हणून काम करायचा.
अक्षय कुमार परदेशातून भारतात परतल्यानंतर त्याने इथे मार्शल आर्टस शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी त्याला तो चांगला दिसतो, उंचीही चांगली आहे, मग मॉडेलिंगमध्ये काम का नाही करत असं विचारलेलं आणि ही गोष्ट त्याच्या मनात राहिलेली. त्यानंतर त्याने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याने फोटोग्राफर जयेश शेठ यांच्याबरोबरही असिस्टंट आणि लाइटमन म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान अभिनेता चित्रपटांत बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम करायचा.
अक्षय कुमारने १९८७ मध्ये आलेल्या ‘आज’ चित्रपटात कराटे इन्स्ट्रक्टरची भूमिका साकारलेली. पण, ही भूमिका खूप छोटी होती. याच चित्रपटानंतर त्याने त्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ चित्रपटात काम करत खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, यातून त्याला फार ओळख मिळाली नाही. १९९२ मध्ये आलेल्या ‘खिलाडी’ चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने, ‘मोहरा’, ‘हेरा फेरी’, ‘सिंग इज किंग’, ‘एयरलिफ्ट’, ‘टॉयलेट -एक प्रेम कथा’, ‘केसरी’, ‘गुड न्यूज’ आणि ‘सूर्यवंशी’सारख्या चित्रपटांत काम केलं. अक्षय कुमारने त्याच्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत १५० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे.
अक्षय कुमारची नेटवर्थ
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारची एकूण संपत्ती ही जवळपास २,५०० कोटी इतकी आहे. एका चित्रपटासाठी अक्षय कुमार कमीत कमी ६०-९० कोटी रुपये मानधन घेतो. या व्यतिरिक्त ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ (Cape Of Good Films) या त्याच्या निर्मिती संस्थेतूनही चांगली कमाई होते. ‘एयरलिफ्ट’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘पॅड मन’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्याच्या या निर्मिती संस्थेतूनच करण्यात आली.
अक्षय कुमार याव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट, फॅशन ब्रँड आणि रिअल इस्टेट यांमधूनही नफा कमावतो. अभिनेत्याकडे ८० कोटी रुपयांचे एक सी फेसिंग घरसुद्धा आहे. यासह त्याचं ७.८ कोटींचं एक अपार्टमेंटही आहे.