मनोरंजनसृष्टीत खिलाडी अशी ज्याची ओळख आहे, तो अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. अक्षय कुमार आपल्या चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता तो लवकरच ‘सरफिरा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटातील एका प्रसंगाविषयी त्याने खुलासा केला आहे.

‘गल्लाटा प्लस’ ला दिलेल्या मुलाखतीत भारद्वाज रंगन यांच्याशी बोलताना चित्रपटातील एका प्रसंगाविषयी त्याने खुलासा केला आहे. ‘सरफिरा’ चित्रपटाचे शूटिंग करताना सगळ्यात कठीण गोष्ट कुठली वाटली, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्याने सांगितले की, चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याशी माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंग जोडले जातात. चित्रपटात माझे जे पात्र आहे, त्याच्या वडिलांचे निधन होते आणि ते पात्र त्या दु:खातून जात असते. खरं सांगायचे तर मी देखील माझे वडील गेल्यानंतर अशाच धक्क्यातून जात होतो. तो सीन जेव्हा मी शूट केला, तेव्हा मला नेहमीप्रमाणे ग्लिसरीनची गरज वाटली नाही. मला माझे वडील गेले तेव्हा जे वाटले होते ते त्यावेळी मी माझ्या भूमिकेत उतरवले, त्या सीनवेळी माझ्या डोळ्यात आलेले पाणी हे खरे होते. सुधाने जेव्हा कट म्हटले, तेव्हादेखील माझे डोके खाली होते. कारण त्या भावनेतून परत येणे, माझ्यासाठी शक्य होत नव्हते. म्हणून मी सुधाला हा शॉट जास्त वेळ घ्यायला सांगितला. कारण त्यावेळात तो क्षण मी जगू शकत होतो. पुढे अक्षयने याची कबुली दिली की, सुधा आणि मला एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धतीला समजून घेण्यासाठी एक आठवडा गेला.

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी झालेली शिव शक्ती पूजा का केली जाते? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुधा यांनीदेखील एका मुलाखतीत अक्षय आणि त्यांच्या कामातील वेगळेपणाविषयी भाष्य केले होते. गल्लाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, अक्षय सुरुवातीचे पहिले सहा दिवस अजिबात खूश नव्हता. तो विचार करत असे की, ही कशी मुलगी आहे, मला वेड्यासारखे काहीही करायला लावते. त्यानंतर निर्माते आणि त्याने माझ्याशी संवाद साधला. मी त्याला म्हटलं की, तुला जे करायचे आहे ते तू कर. मला काही सुधारणा सांगायच्या असतील तर त्या मी सांगेन. डेक्कन एअरलाइन्स ज्या व्यक्तीने उभारली, त्या व्यक्तीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. ‘सोरारई पोटरु’ या तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या बायोपिकवर हा चित्रपट आधारित आहे. या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.