Akshay Kumar Beach Clean Video : बॉलीवूडमध्ये ‘खिलाडी’ म्हणून लोकप्रिय असलेला अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. पण अभिनयाबरोबरच तो त्याचं सामाजिक भानही जपताना दिसतो. आपल्या सिनेमांतून अनेकदा सामाजिक संदेश देत असतो. पण केवळ चित्रपटांपुरतंच मर्यादित न राहता, तो अनेकदा खऱ्या आयुष्यातदेखील ही जबाबदारीही पार पाडतो.
अशातच नुकत्याच पार पडलेल्या गणपती विसर्जनानंतर, अक्षय कुमारने असाच एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज अक्षयने मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावरील साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्याने समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याची साफसफाई केली.
शुक्रवारी मुंबईत गणपती बाप्पाचं विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गिरगाव चौपाटी, जुहू आणि वर्सोवा बीचवर मोठ्या संख्येने मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मात्र, विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचलेली दिसली.
त्यामुळे शनिवारी सकाळी जुहू बीचवर साफसफाई अभियान राबवण्यात आलं. याचं आयोजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या मोहिमेत त्या स्वतःही सहभागी झाल्या होत्या आणि अक्षयसह स्वच्छता करताना दिसून आल्या.
अक्षय कुमार साफसफाई करतानाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून सोशल मीडियावर लोक त्याचं कौतुक करत आहेत. “अक्षय कुमार नेहमीच चांगले काम करतो”, “सिनेमाबरोबरच अक्षय खऱ्या आयुष्यात सुद्धा हिरोच आहे” या आणि अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसंच तर अनेकांनी हार्ट इमोजी वापरत त्याच्या या सामाजिक कार्याला भरभरून दाद दिली आहे.
अक्षय कुमारचा साफसफाई करतानाचा व्हिडीओ
याबद्दल अक्षयने असं म्हटलं की, “स्वच्छता ही फक्त सरकार किंवा BMC ची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही हाच संदेश आहे.” तसंच त्याने लोकांना आवाहन केलं की, “सण-उत्सवांनंतर समुद्रकिनाऱ्यावर कचरा टाकू नका, आणि जिथे घाण असेल तिथे साफसफाई करा.”
दरम्यान, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो नुकताच ‘हाऊसफुल ५’मध्ये झळकला होता. लवकरच तो ‘जॉली एलएलबी ३’मध्ये दिसणार असून, यात त्याच्याबरोबर अर्शद वारसी आणि सौरभ शुक्लासुद्धा आहेत. त्याचबरोबर अक्षय सध्या ‘भूत बंगला’ आणि ‘हेरा फेरी ३’ यांसारख्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.