Aliya Bhatt Talks About Husband Ranbir Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. आलिया अनेकदा तिचा नवरा व लेक राहाबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अनेकदा मुलाखतींमध्ये दोघे एकमेकांबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता आलियाने नवरा रणबीरबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
आलियाने नुकतीच काजोल व ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी तिच्याबरोबर अभिनेता वरुण धवनही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात काजोल व ट्विंकलबरोबर संवाद साधताना तिने रणबीरबरोबर लग्न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
आलिया भट्टने ‘या’ कारणामुळे केलेलं रणबीर कपूरबरोबर लग्न
आलिया रणबीर व तिच्या नात्याबद्दल म्हणाली, “रणबीरचं व माझं नातं खूप चांगलं आहे. आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री आहे. आम्ही आधी मित्र होतो. मी त्याच्याबरोबर एका कारणामुळे लग्न केलं, कारण मला वाटतं तो खूप उत्कृष्ट माणूस आहे. आम्हाला एकमेकांना ट्रोल करायला खूप आवडतं.”
आलियाने पुढे सांगितलं, तिच्यासाठी फक्त मैत्री पुरेशी नसून नात्यात आदर असणं, एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. अभिनेत्री म्हणाली, “कारण आदर कायम इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. पाठिंबा देणं असो किंवा प्रेम करणं, पण माझ्यासाठी लग्नानंतर त्या नात्यात एकमेकांबद्दल आदर असणं फार महत्त्वाचं आहे.”
आलिया व रणबीरने एप्रिल २०२५ मध्ये लग्नगाठ बांधलेली. त्यापूर्वी दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नानंतर त्यांच्या मुलीचा राहाचा जन्म झाला. दोघे अनेकदा लेकीबरोबर स्पॉट होत असतात. त्यांच्या लेकीचे सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आलिया व रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दोघे लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मधून झळकणार आहेत. यासह रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे; तर आलिया भट्टसुद्धा तिच्या ‘अल्फा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असून येत्या काळात दोघांचेही हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.