Allu Arjun : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. ‘जवान’ने अनेक रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने सांभाळली होती. २०१३ मध्ये अ‍ॅटलीने त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि केवळ चारच चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर त्याने शाहरुखबरोबर ‘जवान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

अल्लू अर्जुनचा अ‍ॅटलीबरोबर नवीन चित्रपट

‘जवान’नंतर त्याचं नाव देशभरात पोहोचलं असून केवळ तमिळच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक म्हणून आता त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे. अशातच आता शाहरुख खाननंतर तो ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनबरोबर एक चित्रपट करत आहे, ज्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पडद्यामागील काही खास क्षण शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

नव्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनची खास लूक टेस्ट

अशातच आता अ‍ॅटलीच्या अल्लू अर्जुनबरोबरच्या चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या चित्रपटासाठीचे एक खास फोटोशूट पार पडले. शिवाय लवककरच चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे. मिड-डे मधील एका वृत्तानुसार, या चित्रपटासंबंधित रविवारी लूक टेस्ट आणि फोटोशूट पार पडले. मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये हे लूक टेस्ट आणि फोटोशूट झाले. अल्लू अर्जुनच्या लूक टेस्टसाठी काही १२ वर्षांच्या मुलांनाही निवडण्यात आले आहे.

अ‍ॅटली अल्लू अर्जुनला एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर आणणार

वृत्तांनुसार, अल्लू अर्जुनची लूक टेस्ट दुपारी १ वाजता सुरू झाली. अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला लक्षात घेऊन वेगवेगळे लूक तयार करण्यात आले. खरंतर, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’मुळे स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे अ‍ॅटली आता त्याला एका नवीन रुपात लोकांसमोर आणू शकतो. त्यामुळे आता अल्लू अर्जुनला नवीन रूपात पाहण्यासाठी त्याचे चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत.

सलमान खाननंतर अ‍ॅटलीच्या चित्रपटात अल्लू अर्जुनची वर्णी

अ‍ॅटली कुमारला आधी सलमान खानबरोबर काम करायचे होते; पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे सलमान यातून बाहेर पडला आणि तो बाहेर पडल्यानंतर, अ‍ॅटलीने अल्लू अर्जुनला चित्रपटात घेतले. अ‍ॅटलीने या चित्रपटाच्या कथेबद्दल काही माहिती दिलेली नाही. पण अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुन यांना एकत्र पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाची अनेकांना उत्सुकता

अ‍ॅटली आणि अल्लू अर्जुनच्या या आगामी चित्रपटाचं अधिकृत नाव अद्याप समोर आलेलं नाही. पण, या चित्रपटाला तात्पुरते ‘AA 22 X A6’ असं नाव देण्यात आलेलं आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनचा हा २२ वा तर अ‍ॅटलीचा सहावा चित्रपट आहे. ज्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत.