गोव्यातील ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये ‘द काश्मीर फाईल्स’संदर्भात इस्रायली दिग्दर्शक आणि ‘इफ्फी’चे समिक्षक प्रमुख नदव लॅपिड यांनी केलेल्या टीकेवरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा ‘व्हल्गर’ आणि प्रपोगांडा पसरवणारा चित्रपट असल्याचं लॅपिड यांनी म्हटलं असून आता या विधानावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. असं असतानाच इस्त्रायलचे भारतामधील राजदूत नाओर गिलॉन यांनी लॅपिड यांचे कान टोचले आहेत.
नाओर गिलॉन यांनी ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये इस्रायली दिग्दर्शक आणि निर्माते नदव लॅपिड यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही ट्वीट करत गिलॉन यांनी लॅपिड यांच्यावर टीका केली आहे. नावेद लॅपीड यांनी काश्मीर फाइल्ससंदर्भात केलेल्या टीकेवरुन त्यांच्यासाठी हे खुलं पत्र. मी तुम्हाला सर्वात शेवटची ओळख आधी सांगतो आणि म्हणजे लॅपिड यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे,” असं म्हणत गॅलिन यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. त्या खालोखाल त्यांनी ११ ट्वीट केलेत.
“भारतीय संस्कृतीमध्ये पाहुणे हे देवाप्रमाणे असतात असं म्हणतात. तुला भारतामधील ‘इफ्फी’साठीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिलेल्या आमंत्रणाचा मान तू ठेवला नाही. तू भारतीयांचा विश्वास, सन्मान आणि पाहुणचाराचा अपमान केला. तुला दोन्ही देशांमधील प्रेम आणि नातेसंबंध साजरे करण्याच्या दृष्टाने या कार्यक्रमाला आमंत्रित केलेलं. तू जे काही मत मांडलं त्याच्यासाठी तुझ्याकडे कारणं असतील पण त्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना मी आणि उपस्थित मंत्र्यांनी त्या मंचावर आपल्या दोन्ही देशांचा शत्रू सारखाच असून आपण सारख्याच शत्रूचा सामना करत आहोत जो आपला शेजारी आहे असं का म्हणाला? आम्ही दोन्ही देशांमधील सामन्य आणि नातेसंबंधांवर भाष्य केलं. उपस्थित मंत्र्यांनी त्यांचे इस्त्रायलबद्दलची मत मांडली. इस्त्रायल हा हायटेक देश असून तो चित्रपटसृष्टीलाही आव्हान देऊ शकतो, असं ते म्हणाले. मी माझ्या भाषणात आम्ही भारतीय चित्रपट पाहत मोठे झाल्याचा उल्लेख केला. मी असंही म्हणालो की चित्रपटांचा एवढा मोठा वारसा असलेल्या भारतासारख्या देशात आपल्या देशातील म्हणजेच इस्रायलमधील कंटेट (फौदा आणि इतरही) पाहिला जातो याबद्दल आपण विनम्र असलं पाहिजे,” असं गिलॉन यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप
“मी काही चित्रपटतज्ज्ञ नाही मात्र असंवेदनशीलपणे आणि पूर्वग्रह दूषित ठेऊन ऐतिहासिक घटनांबद्दल पूर्ण अभ्यास न करता बोलणं चुकीचं आहे. विशेष म्हणजे ही अशी घटना आहे जी आजही भारतासाठी एखाद्या जखमेप्रमाणे असून अजूनही त्यात अनेकजण भरडले जात आहेत आणि त्याची किंमत चुकवत आहेत. या प्रकरणानंतर भारतातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहून फार दु:ख होत आहे. तुझ्या विधानाचं स्पष्टीकरण देता येणार नाही. काश्मीर विषयाची संवेदनशीलता (या चित्रपटामध्ये) दिसून येते. तू ‘व्हायनेट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तू काश्मीर फाइल्सवरील टीका आणि सध्या इस्त्रायलमध्ये सुरु असलेल्या तुला न आवडणाऱ्या घटनांचा संबंध जोडून हे राजकीय भाष्य असल्याचं सूचित केलं आहे,” असंही गिलॉन यांनी म्हटलं आहे.
“मी तुला इतकाच सल्ला देईन
की यापूर्वीही तू ज्याप्रकारे उघडपणे भाष्य केलं आहे त्याप्रमाणे इस्त्रायलमधील घडामोडींबद्दल नाराजी व्यक्त करु शकतोस किंवा टीका करु शकतो. मात्र त्याचा संताप तू इतर देशांमध्ये जाऊन अशाप्रकारे व्यक्त करु नये. तू अशाप्रकारे तुलना करण्यामागील नेमकी कारणं आणि मुद्दे काय आहेत मला याची कल्पना नाही. तू इस्रायलला जाऊन विचार करशील की तू फार बोल्ड आणि मोठं विधान केलं. मात्र आम्ही इस्रायलचे येथील प्रतिनिधी इथेच वास्तव्यास आहोत. तू तुझ्या या शौर्यानंतर आमचे डायरेक्ट मेसेजचे चॅट पाहिले पाहिजेत. त्यामधून तुला अंदाज येईल की माझ्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमला इथे काय अडचणींना सामना करावा लागतोय,” असंही गिलॉन यांनी म्हटलं आहे.
“भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील मैत्री आणि नाते संबंध फार मजबूत आहेत. हे संबंधांवर तुझ्या विधानांमुळे परिणाम होणार नाहीत. एक व्यक्ती म्हणून मला फार लाज वाटत आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या मोबदल्यात आणि मैत्रीच्या बदल्यात आपण त्यांच्यावर जी टीका केली आहे त्यासाठी मी आपलं आदरातिथ्य करणाऱ्या देशाची माफी मागू इच्छितो,” असं गिलॉन शेवटच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
या प्रकरणावरुन मनोरंजनसृष्टीबरोबरच राजकीय क्षेत्रातूनही आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.