Why Ameesha Patel is Single : बॉलीवूडमधील काही सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमीषा पटेल. ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अमीषाने करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलीवूड चित्रपटांचा एक काळ अमीषाने चांगलाच गाजवला आहे. आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान मिळवणारी अमीषा नात्यांबद्दल फारशी नशीबवान राहिली नाही. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती ४९ वर्षीही एकाकी जीवन जगत आहे.
याच एकाकी जीवनाबद्दल आणि ४९ व्या वर्षी अविवाहित असण्याबद्दल अमीषाने नुकतंच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अभिनय क्षेत्रातील व्यग्रतेमुळे कुणाशी लग्न करणं तिला पटत नाही. तसंच एकाकी जीवन जगतानाही मी खुप आनंदी आहे असं ती म्हणते. फिल्मी मंत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या याच वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी अमीषा म्हणाली की, “मला वाटतं की, मी माझे आयुष्य ज्या पद्धतीने जगत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला जोडीदाराची कमतरता भासत नाही. मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की, याची मला गरज नाही. मी अमीषा पटेल आहे आणि माझी मी एकटी आनंदी आहे.” अमीषाला अभिनय क्षेत्रातील व्यग्रतेत कुणाशी लग्न करणं पटत नाही.
याबद्दल तिने असं म्हटलं की, “एखाद्या पुरूषाला तुमच्या छत्रछायेखाली राहणे खूप कठीण आहे. अर्थात, त्याला माझ्या आनंदापुढे इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व द्यावे लागते. त्यात कामाचे अनेक तास, अनियमित वेळापत्रक, कामाच्या वचनबद्धता आणि एकूणच हा प्रवास समजून घ्यावा लागतो. या सर्वांमध्ये मला वाटत नाही की, मी नात्याला योग्य तो न्याय देऊ शकते.”
यानंतर अभिनेत्रीला नातेसंबंध तिच्या प्राधान्य यादीत आहेत का? असे विचारले असता ती म्हणाली, “देवाच्या कृपेने, मला खूप काही मिळाले आहे. कदाचित मी जे काही मागितले आहे; त्यापेक्षा जास्त मिळाले आहे. माझ्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे आणि मी हे अभिमानाने सांगू शकते. मी अहंकाराने नाही तर हे खरं तेच बोलत आहे.”
दरम्यान, अभिनेत्री अमीषा पटेल विक्रम भट्ट यांच्याबरोबर पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या घरून विरोध होता. या विरोधामुळेच तिचे पालकांशी वाद झाले. नंतर तिने कणव पुरीबरोबरच्या नात्याचीही कबुली दिली होती, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तर प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड असणाऱ्या नेस वाडियालादेखील तिने डेट केले होते. नेसला अमिषाशी लग्न करायचे होते, मात्र तिला करिअर करायचे होते. त्यामुळे हे दोघे वेगळे झाले.