बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलचं लक्झरी बॅग्जबद्दल असलेलं प्रेम सर्वांनाच माहीत आहे. अमीषाने फराह खानच्या व्लॉगमध्ये तिचे बॅग कलेक्शन दाखवले. अमीषाकडे सुमारे ४०० डिझायनर बॅग्ज आहेत. बॅग्जची मुलांसारखी काळजी घेत असल्याचं अमीषाने सांगितलं. एकता कपूर, साक्षी तंवर अशा अनेक सेलिब्रिटींनी अविवाहित असूनही सरोगसी व मुलं दत्तक घेऊन मातृत्वाचा अनुभव घेतला. ५० वर्षीय अमीषाही मुलांबद्दल व्यक्त झाली आहे.
रणवीर अलाहाबादियाशी बोलताना अमीषा म्हणाली, “मला मुलं खूप आवडतात. मी माझ्या भाच्या, पुतण्या आणि चुलत भावांचे डायपर बदलायचे. त्यांना खाऊ घालायचे, त्यांना झोपवायचे. त्यावेळी मी म्हणायचे की मी एक क्रिकेट टीम होईल इतकी मुलं जन्माला घालेन. त्यावेळी माझी आई म्हणायची, फक्त एक मूल होऊदे, मग आपण पाहू. कारण मुलांना जन्म देणं, आई होणं खूप कठीण आहे. मला लहान मुलं खूप आवडतात.”
अमीषाने दत्तक घेतलीत मुलं
काही मुलांना दत्तक घेतलंय, पण त्याची वाच्यता करत नसल्याचं अमीषाने कबूल केलं. अमीषा त्या मुलांना शिक्षणासाठी आणि इतर खर्चासाठी मदत करत आहे. “मला नेहमीच अनाथ मुलांबद्दल काळजी वाटते आणि त्यांना हक्काचं घर देणं ही किती सुंदर भावना असेल, असे विचार मला यायचे. त्यामुळे मी कुणालाही न सांगता काही मुलांना दत्तक घेतलंय. त्या मुलांनाही हे माहित नाही की मी त्यांना दत्तक घेतलं आहे. मी त्यांच्या शिक्षणाचा खर्च देते. त्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी मी त्यांना वैद्यकीय व शिक्षणासाठी मदत करते. एक मूल वाढवणं ही मोठी जबाबदारी आहे, त्यामुळेच माझ्याकडे पाळीव प्राणी नाही,” असं अमीषा म्हणाली.
अमीषाला बॅग्जची आवड का आहे?
अमीषा पटेलला बॅग कलेक्शनबद्दल विचारण्यात आलं. तिला लहानपणापासूनच बॅगची इतकी आवड का आहे? असं विचारल्यावर ती म्हणाली, “मला मुलं नाहीत, म्हणून माझ्याकडे बॅग्ज आहेत. मी १६ वर्षांची असल्यापासून बॅग्ज गोळा करत आहे, मी माझ्या आई आणि काकूंना बॅग्जचे कलेक्शन करताना पाहिलंय. माझ्या कुटुंबात सर्वांना अॅक्सेसरीज आवडतात. मी लहानपणापासून हेच पाहिलंय म्हणून मला बॅग्जची आवड निर्माण झाली. ५-६ वर्षांची असतानाही शूज आणि बॅग्ज मी नेहमीच मॅचिंग घालायचे. माझ्याकडे नेहमीच परफ्यूमची बाटली आणि कंगवा असायचा. मला सर्व डिझायनर्सचा इतिहास आणि त्यांच्या प्रवासाबद्दल माहिती आहे.”
अमीषा शाळेत ब्रँडेड बॅग्ज घेऊन जायची. “माझ्याकडे मोशिनो आणि लुई व्हिटॉनच्या स्कूल बॅग होत्या. जेव्हा भारतातील लोकांना या ब्रँड्सबद्दल माहिती नव्हती आणि त्या बॅग्ज इथे मिळायच्या नाही, तेव्हा माझ्याकडे त्या होत्या. मी त्या विदेशातून आणायचे. मी आई व मावशीच्या बॅग्ज वापरायचे,” असं अमीषा म्हणाली.
अमीषा तिच्या ब्रँडेड बॅग्जची खूप काळजी घेते. बॅग्ज वेळोवेळी स्वच्छ करणं, बुरशी लागू नये म्हणून उन्हात ठेवणं, पॉलीश करणं या गोष्टी ती करते.